ठाण्यातील मानपाडा येथील दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
येथील मानपाडा मार्केटमधील न्यू पाटीलदार जनरल स्टोअर्समध्ये छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार या दुकानावर धाड टाकली असता विविध नामांकित कंपन्यांच्या गुटख्याचा साठा येथे आढळून आला. अधिक चौकशी केली असता, या दुकानदाराने जवळच असलेल्या न्यू संदेश टोबॅको मार्टमधून गुटख्याची खरेदी केल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. या दुकानातही मोठय़ा प्रमाणावर गुटख्याचा साठा करण्यात आला होता. या दोन्ही दुकानांतून अंदाजे १० हजार रुपये किमतीचा माल अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे.
गुटख्याची विक्री, पुरवठादाराची माहिती तसेच मालाची बिले या दुकानदारांनी उपलब्ध न केल्याने त्यांच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. गानाराम चौधरी (२४) आणि कृष्णकांत पटेल (४५) अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
लाखोंची फसवणूक
डोबिवली : डोंबिवलीजवळील आडिवली गावाजवळ आपल्या जागेत बांधकाम करायचे आहे असे सांगून माझगाव येथील सुजीत विश्वकर्मा यांच्याकडून ७ लाख ९७ लाख रुपये घेतले. नंतर खोल्या देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अनिल शिधवेरा (२१) याच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.