अंबड येथील नंदिनी शर्मा या चिमुरडीच्या अपहरणाची घटना ताजी असतांना शहर परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून पुन्हा दोघांचे अपहरण झाल्याची बाब पुढे आली आहे. या प्रकरणी भद्रकाली आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साधारणत १५ दिवसापुर्वी अंबड शिवारात लाकडी सामान तयार करणाऱ्या शर्मा यांची पाच वर्षांची मुलगी नंदिनी हिला काही संशयितांनी घराच्या आवारातून पळवून नेले. या प्रकरणी अंबड पोलिसांकडून तपास सुरू असला तरी अद्याप अपहृत बालिकेचा शोध लागलेला नाही. संशयिताला अटक झाली नाही. त्यातच चुंचाळे शिवारातील रामकृष्णनगर परिसरात पुन्हा अपहरणाचा प्रकार घडला. या भागात वास्तव्यास असणाऱ्या दत्तु अवसकर यांची मुलगी रोहिणी (१५) ही काही कामानिमित्त दुपारी घराबाहेर पडली होती. तेथील चहाच्या टपरीजवळ आली असतांना काही अज्ञात इसमांनी तिला गाडीतुन पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. दुसरी घटना भद्रकाली भागात घडली. राम क्षत्रिय यांचा मुलगा केतन (५) हा रविवारी दुपारी दोन वाजता चॉकलेट घेऊन येतो असे सांगून बाहेर पडला. दोन तास उलटुनही तो घरी परत आला नाही. कुटुंबियांनी सर्व नातेवाईक, मित्रमंडळीकडे शोधाशोध केली. पण, तो मिळून आला नाही. अखेर भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दरम्यान, शहर परिसरातील लहान बालकांच्या अपहरणाचे प्रकार वाढत असल्याने एखादी टोळी सक्रीय झाली का याचा शोध सुरू आहे. सध्या उन्हाळी सुटी आणि लग्न सराईची धामधूम असल्याने बालकांचा गल्लीतील वावर वाढला आहे. पालकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस यंत्रणेकडून केले जात आहे.