ज्येष्ठ शास्त्रीय संगीत व नाटय़संगीत गायक दिवंगत पं. वसंतराव देशपांडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने वसंतराव देशपांडे संगीत सभा या संस्थेतर्फे १७ आणि १८ ऑगस्ट रोजी मुंबईत दोन दिवसांच्या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात होणाऱ्या या महोत्सवाची संकल्पना ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक आणि पं. वसंतराव देशपांडे यांचे शिष्य पं. चंद्रकांत लिमये यांची आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतात खूप जुनी असलेली ‘गुरु शिष्य’ ही परंपरा आजही टिकून आहे. ‘गुरु शिष्य’ परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने वसंतराव देशपांडे संगीत सभेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
माझे गुरु दिवंगत पं. वसंतराव देशपांडे यांच्या नावाने संगीत सभा संस्थेची स्थापना करण्यात आली असून पं. वसंतराव यांची पुण्यतिथी आणि संस्थेचा १५ वा वर्धापन दिन या दोन्हींचा संयोग साधून हा कार्यक्रम होणार असल्याचे पं. चंद्रकांत लिमये यांनी सांगितले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (१७ ऑगस्ट) पं. चंद्रकांत लिमये आणि त्यांचे शिष्य सुनील पंडित, स्वानंद भुसारी तसेच ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया व त्यांचे शिष्य विवेक सोनार सहभागी होणार आहेत. त्यांना अतुल ताडे (तबला), पं. विजय घाटे (तबला), सुधांशु घारपुरे (संवादिनी) हे संगीतसाथ करणार आहेत. हा कार्यक्रम रात्री आठ वाजता होणार आहे.
१८ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. राम देशपांडे आणि त्यांचे शिष्य आदित्य मोडक, गंधार देशपांडे तसेच पं. पद्मा तळवलकर व त्यांच्या शिष्या गौरी पाठारे, यशस्वी सरपोतदार सहभागी होणार आहेत. त्यांना अतुल ताडे, यती भागवत (तबला), श्रीराम हसबनीस, सुधांशु घारपुरे (संवादिनी) हे संगीतसाथ करणार आहेत. कार्यक्रमाच्या पूर्णोत्सव प्रवेशिका १४ ऑगस्ट पासून रवींद्र नाटय़ मंदिर येथे रसिकांसाठी उपलब्ध असून ९३२२२३९७५१ या क्रमांकावर ऑनलाईन बुकिंगही करता येणार आहे.