लोकसभा निवडणूक कामात कल्याण-डोंबिवली पालिकेतील पाणी विभागातील कर्मचारी व्यस्त असल्याने कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांची पाणी देयके नागरिकांना वाटप करता आली नाहीत. पाणी देयके तर वसूल झाली पाहिजेत म्हणून ‘सुपीक बुद्धी’च्या पालिका अधिकाऱ्यांनी ही देयके नागरिकांच्या थेट जून महिन्यातील देयकात ‘थकबाकीची’ देयके म्हणून दाखवून त्यावर २ टक्के व्याज आकारण्याची छुपी खेळी केली असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याविषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगरसेवक थंड हवेसाठी देशोदेशी फिरत असल्याने त्यांना या विषयाची गंधवार्ता नाही. संगणकात पाणी देयकाची व्यवस्था निश्चित केली असल्याने थकीत रकमेवरील व्याजाची देयके कमी करण्याचा आम्हाला अधिकार नाही, अशी उत्तरे पालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातून नागरिकांना देण्यात येतात. पालिका कर्मचारी लोकसभा निवडणूक कामात व्यस्त होते. त्यामुळे फेब्रुवारी, मार्चमधील पाणी देयके वाटायला कोणी नव्हते, असे पालिका कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याने, त्यात नागरिकांचा काय दोष, असा प्रश्न करदात्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.
* मागील घोळ पुढे कायम
मागील वर्षी मार्च महिन्यात पालिकेने नागरिकांना प्रत्यक्ष जलमापकाचे रीडिंग न घेता सरासरी पाणी आकारणी घेऊन अवाच्या सव्वा रकमेची देयके पाठवली होती. ‘लोकसत्ता’ने हा विषय उघड करताच पालिका प्रशासनाला जाग येऊन सुमारे ४४ हजार चुकीच्या पद्धतीची देयके प्रशासनाला मागे घ्यावी लागली होती. गेल्या वर्षी पाणी देयक वसुलीचे लक्ष्य ७० कोटी रुपये असताना पालिकेने फक्त ३७ कोटी रुपयांची वसुली केली. पाणी देयक वसुलीत पालिकेला ३३ कोटींचा तोटा झाला आहे. हा तोटा वसूल करण्यासाठी पालिका अशा छुप्या खेळी करीत असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे.
* चोरांना फुकट पाणी
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील टिटवाळा, मोहने, आंबिवली, काटेमानिवली, डोंबिवलीत आयरे गाव, कोपर पूर्व, मोठा गाव, रेतीबंदर, देवीचा पाडा, गरिबाचा पाडा, नवा पाडा, कुंभारखाण पाडा भागात बेसुमार अनधिकृत चाळी, बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांना पालिकेच्या जलवाहिनींवरून भूमाफिया पाणी वापरत आहेत. मात्र या माफियांना कोणत्याही प्रकारची देयके पालिकेकडून पाठवण्यात येत नाहीत. या पाणी चोरीतून पालिकेचे दरवर्षी सुमारे ५० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. नागरिकांना पाणी देयकामध्ये दोन टक्के चक्रवाढ व्याज पद्धतीने आकारणी करणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी आहे, अशी टीका होत आहे. बहुतांशी नगरसेवक थंड हवेसाठी परदेशात फिरत असल्याने त्यांना नागरिकांवर आलेल्या संकटाची चाहूल नसल्याचे दिसून येत आहे. पाणी विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.