मान्यताप्राप्त विद्यापीठाऐवजी अभिमत विद्यापीठातून मराठी विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून दोन वेतनश्रेणी मिळविणाऱ्या सुमारे साडेपाच हजार कर्मचाऱ्यांवर पालिका प्रशासनाची वक्रदृष्टी झाली आहे. या पुढे अभिमत विद्यापीठातून हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वेतनश्रेणी देऊ नयेत, असे स्पष्ट करतानाच यापूर्वी कर्मचाऱ्यांना दिलेल्या दोन वाढीव वेतनश्रेणीदेखील वसूल करण्याचे आदेश दस्तुरखुद्द पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी दिले आहेत. यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये संताप उसळला आहे.
मराठीतून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वेतनश्रेणीपोटी सुमारे १२०० ते १६०० रुपये मिळत आहेत. वर्षांकाठी १५ ते १८ हजार रुपये कर्मचाऱ्यांना मिळत होते. मात्र टिळक विद्यापीठातून हा अभ्यासक्रम पूर्ण करून वेतनश्रेणी मिळविलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ही रक्कम वसूल करण्यात येणार आहे. अभिमत विद्यापीठातून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्याला वेतनश्रेणी मिळणार नाही, असे आयुक्तांनी सुरुवातीलाच स्पष्ट करायला हवे होते. मग टिळक विद्यापीठात आम्ही प्रवेशच घेतला नसता, अशी संतप्त प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात शंभर टक्के मराठीचा वापर व्हावा आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मराठीमधून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वेतनश्रेणी देण्याची मागणी मनसेचे माजी नगरसेवक मंगश सांगळे यांनी केली होती. सर्व पक्षांनी आग्रह धरल्यानंतर ९ मार्च २०११पासून प्रशासनाने मराठीतून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आणि भविष्यात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन वेतनश्रेणी देण्याची योजना लागू केली. त्यानंतर दोन वेतनश्रेणी मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मोठय़ा संख्येने मराठीतून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. असंख्य कर्मचाऱ्यांना मुंबई विद्यापीठात प्रवेश मिळू शकला नाही. परंतु निराश न होता त्यांनी अभिमत विद्यापीठ असलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्रवेश घेतला.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात २०११मध्ये प्रवेश घेऊन काही कर्मचाऱ्यांनी २०१३मध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्णही केला. या कर्मचाऱ्यांना दोन वेतनश्रेणीही मिळाल्या. दरम्यानच्या काळात आणखी काही कर्मचाऱ्यांनी याच विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. परंतु आता प्रशासनाने अभिमत विद्यापीठ असलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या नावावर काट मारली आहे. या विद्यापीठातून मराठीमधून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करणाऱ्यांना या योजनेचा लाभ द्यायचा नाही, असा निर्णय पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतला आहे. इतकेच नव्हे तर आतापर्यंत या विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवून पदरात दोन वेतनश्रेणी पाडून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ती रक्कम वसूल करण्याचे आदेशही सीताराम कुंटे यांनी दिले आहेत. या संदर्भातील एक परिपत्रक आयुक्तांनी सर्व विभागप्रमुखांना पाठविले आहे.
मिळालेल्या दोन वेतनश्रेणी आपल्या वेतनातून कापून घेण्यात येणार असल्याने कर्मचारी प्रचंड संतापले आहेत. आयुक्तांनी या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी ते लवकरच महापौर सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांची भेट घेणार आहेत. तसेच प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी गटनेत्यांचीही मदत घेण्याचा कर्मचाऱ्यांचा इरादा आहे. यामुळे लवकरच आयुक्त विरुद्ध कर्मचारी असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.