वर्धा जिल्ह्य़ातील पुलगावजवळ बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्यासुमारास विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेली स्कूल व्हॅन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात दोन विद्यार्थी ठार तर सातजण जखमी झाले. जखमींमध्ये दोन शिक्षिकांचा समावेश आहे.
पुलगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन (एम.एच. ३२ सी. ३७३) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात व्हॅनमध्ये समोर बसलेले विद्यार्थी आशय अशोक रामटेके (१०) व सम्राट प्रफुल्ल काळे (५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर व्हॅनमधील जिया डोंगरे, मयुरी मून, आयुष भगत, आदित्य मुनेश्वर, ताकसांडे यांच्यासह शिक्षिका नाजिया पठाण व रिना ढवळे असे सातजण जखमी झाले. दुर्घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली. इतर वाहनातील चालक विद्यार्थ्यांच्या मदतील धावले.
जखमींना सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. स्कूल व्हॅनचा चालक नीलेश दालगे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 पाच वऱ्हाडी जखमी
रस्ते अपघातांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच असून वाहतूक नियंत्रण विभाग काय करतो असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज अकोल्यापासून सुमारे २२ किमी अंतरावरील बाळापूर येथे एका लग्न व-हाडाच्या वाहनाला एका कंटेनरने धडक दिली. या अपघातात लग्न व-हाडातील ५ जण जखमी झाले. लग्न व-हाडाचे वाहन बाíशटाकळी येथून जामनेर येथे जात होते. बाळापूर शहराजवळच पोलीस केंद्राजवळ एका कंटेनरने त्या वाहनाला धडक दिली. त्यात लग्न व-हाडातील ५ लोकांना किरकोळ मार लागला. जखमींना अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
 दरम्यान,  मलकापूर येथे व्याळा येथून लग्नासाठी जाणा-या वाहनाने महामार्ग क्र.६ वरील टेंभुर्णा फाटय़ाजवळ एस.टी. बसला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले. अरुण पागदाने व राजेश नांदोकार अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यांना प्रथम खामगाव येथील सामान्य रूग्णालयात दाखल केले, नंतर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आले आहे.