गतिमंद मुलींच्या शाळेत एका गतिमंद तरुणीवर दोघा शिक्षकांनीच बलात्कार केल्याची संतापजनक घटना शहरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या त्या दोघा शिक्षकांना दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
विजापूर रस्त्यावरील सोनामातानगरात मनसेचे पदाधिकारी श्याम राठोड यांच्या संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या गतिमंद मुलींच्या निवासी शाळेत घडलेल्या या घटनेप्रकरणी वसतिगृह अधीक्षक भगवान सुखदेव जिवरग (वय २४) व शिक्षक कृष्णा उत्तमराव काथार (वय २३, दोघे रा. सोनामातानगर, विजापूर रोड, सोलापूर) या दोघा शिक्षक कर्मचाऱ्यांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांनी दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सदर पीडित गतिमंद तरुणी २१ वर्षांची आहे. मागील तीन महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार केला जात होता. वसतिगृह अधीक्षक जिवरग व शिक्षक काथार या दोघांनी आणखी किती गतिमंद मुलींवर अत्याचार केले, याचा पोलीस तपास करीत आहेत. दुपारच्या जेवणाच्या सुटीत पीडित तरुणीला जिवरग व काथार हे दोघे शाळेच्या गच्चीवर नेत व गतिमंदपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार करीत असत. शाळेतील रखवालदाराने हे दृश्य नजरेस पडताच हे प्रकरण उघडकीस आले. सदर पीडित तरुणीच्या आईने या प्रकरणी पोलिसात फिर्याद नोंदविली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शीत विद्यार्थिनीचा विनयभंग
बार्शी येथे नवीन मराठी शाळेत तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या एका निष्पाप बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी हरिदास मस्के (वय ५०, रा. बार्शी) याच्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हरिदास हा शाळेतील वेळापत्रकावर नजर ठेवून मुलींना अडवून व दमदाटी करून त्यांचा विनयभंग करीत असे. मागील अनेक दिवसांपासून हे विकृत चाळे करणाऱ्या हरिदासला अखेर पकडण्यात आले. त्याच्याविरुध्द विनयभंगाच्या गुन्ह्य़ासह बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याखाली (२०१२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.