नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते व पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनधिकृतपणे नळजोडणी झाल्याने पूर्वी झोपडपट्टी व गावठाण परिसरात नागरिकांना मिळणारा पाण्याचा पुरवठा आता कमी दाबाने होत आहे. त्यामुळे पाण्यासाठी रहिवाशांना वणवण भटकावे लागत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने २००० पर्यंतच्या झोपडय़ांना अधिकृतरीत्या पाणीपुरवठा केल्याच्या धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिकेने निवडणुकीच्या तोंडावर २००० सालापर्यंतच्या घरांना पाणीपुरवठा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व विभाग कार्यालयांमध्ये २००० च्या अगोदरची झोपडी असल्याचा पुरावा दाखवत नळजोडणी घेण्यासाठी नागरिक हेलपाटे घालत असून त्यांना महापालिकेच्या वतीने नळजोडणी देण्यात येत आहे. १९९५च्या अगोदरच्या झोपडय़ांना देण्यात येत असलेल्या पाण्याच्या पाइपलाइनमधूनच पाण्याची नळजोडणी करून देण्यात येत आहे.  पालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने २००० नंतरच्या झोपडय़ांनीदेखील अनधिकृतपणे पाण्याची नळजोडणी करून घेतली आहे. महानगरपालिकेने पाण्याच्या पाइपलाइन वाढवल्या नसून जुन्याच पाइपलाइनमधूनच पाणीपुरवठा होत असल्याने १९९५ च्या अगोदरच्या झोपडय़ांना आता कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गणपती पाडा, ईश्वर नगर, रामनगर, दिद्या, इलठण पाडा, यादव नगर, चिंचपाडा, रबाले, तुभ्रे इत्यादी झोपडपट्टी भागांमध्ये दुमजली घरे बांधली आहेत. परंतु पूर्वीच्याच पाइपलाइनमधून अनधिकृतपणे घेण्यात आलेल्या पाण्यामुळे दुमजली बांधण्यात आलेल्या घरांना  पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून नागरिक वैतागले आहेत.
२००० नंतरच्या झोपडधारकांनी अनधिकृतरीत्या घेण्यात आलेल्या नळजोडणी तोडण्यात येणार असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. अशा नळजोडणी धारकाला नोटीस बजावण्यात आली आहे. अनधिकृतपणे घेण्यात आलेल्या नळजोडणीधारकांवर कारवाई करून नळजोडणी तोडल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल.
    -अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता,
    पाणीपुरवठा विभाग,
    नवी मुंबई महानगरपालिका