शहरात मंगळवारी दुपारी अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या सायंकाळी नियोजित सभेवर पुन्हा पाणी फेरले जाते की काय, अशी साशंकता भाजपच्या पदाधिकारी व उमेदवारांमध्ये पसरली. दुसरीकडे या पावसाने विरोधी पक्षांतील उमेदवारांना जरा हायसे वाटले. दुपारी काही मिनिटे मध्यवस्तीत झालेली वृष्टी सभास्थानाच्या परिसरात नसल्याचे समजल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला, तर विरोधी पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे चेहरे पुन्हा ‘जैसे थे’ बनले. सकाळपासून ढगाळ हवामान व दुपारी काही भागांत पावसाने हजेरी लावल्याने सभेच्या वेळेपर्यंत पावसाची धाकधुक राजकीय पटलावर कायम राहिल्याचे पाहावयास मिळाले. ग्रामीण भागातील इतर नेत्यांच्या सभांवरही पावसाने अशीच अस्वस्थता दाटलेली होती.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अतिशय अल्प कालावधी बाकी असून सर्वच प्रमुख पक्षांकडून जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे.
भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी नियोजित सभेवर पावसाने पाणी फेरले. त्यानंतर या सभेसाठी मंगळवारी सायंकाळचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. त्या अनुषंगाने सभास्थानी पुन्हा एकदा जय्यत तयारी करण्यात आली. सभेचा दिवस मुळात ढगाळ वातावरणात उजाडला. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी चिंता, तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले. दुपारी महात्मा गांधी रोड, सीबीएससह काही भागांत अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात सभा होते की नाही याबद्दल शंकेची पाल चुकचकली. काहींनी वरिष्ठांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तपोवन परिसरात पावसाचा मागमूसही नसल्याची माहिती मिळाल्यावर भाजप पदाधिकाऱ्यांचा जीव भांडय़ात पडला. परंतु त्यानंतरही ढगांचा अधूनमधून गडगडाट होत असल्याने त्यांची अस्वस्थता सायंकाळपर्यंत कायम राहिली. भाजप उमेदवारांचे लक्ष तर प्रचारात कमी आणि आकाशाकडे अधिक होते.
याआधी रद्द कराव्या लागलेल्या मोदी यांच्या सभेचा बराच गाजावाजा झाला होता. पंतप्रधान नाशिकमध्ये प्रथमच येत असल्याने सर्वाचे सभेकडे लक्ष आहे. मंगळवारी सायंकाळी निश्चित केलेली सभा होईल की नाही याकडे इतर राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नेत्यांचे बारकाईने लक्ष होते. या वातावरणात मायावती यांची सभा नाशिक रोड येथे पार पडली.
राष्ट्रवादीतर्फे खा. सुप्रिया सुळे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभांवर पावसाचे सावट असल्याने उमेदवार व पदाधिकाऱ्यांमधील अस्वस्थता स्पष्टपणे दिसत होती. भाजपची सभा होईल की नाही याबद्दल कार्यकर्ते संभ्रमात होते. कायम सर्वसामान्यांसह शेतकरी वर्गाला अस्वस्थ करणाऱ्या पावसाने राजकीय पटलावरील नेत्यांना किती अस्वस्थ केले याचे चित्र शहरासह जिल्ह्यात पाहावयास मिळाले.