थंडीने ठोकलेला मुक्काम, अधूनमधून झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यानंतर उत्तर महाराष्ट्राची पावले आता उन्हाळ्याच्या दिशेने पडू लागली आहेत. रात्री गारवा तग धरून असला तरी दिवसा जाणवणाऱ्या उन्हाच्या तीव्र झळांनी जनजीवनावर विपरित परिणाम होऊ लागल्याचे चित्र आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकच्या तापमानाने फेब्रुवारीच्या मध्यावर ३४ अंशांचा टप्पा पार केला असताना सर्वाधिक तापमानाची नोंद करणाऱ्या जळगाव जिल्ह्यात तुलनेत कमी म्हणजे पारा ३२ अंशावर आहे. या घडामोडींमुळे या वर्षी उन्हाळा चांगलाच टळटळीत राहण्याची शक्यता व्यक्त होत असून वीज भारनियमनही सुरू असल्याने उकाडा असह्य होणार आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या तापमानात सर्वसाधारणपणे फेब्रुवारीपासून बदल होत असतात. पावसाळा व हिवाळा हे मागील दोन्ही हंगाम पोषक ठरले होते. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे हा परिसर कित्येक दिवस थंडीच्या दुलईत लपेटला गेला होता. फेब्रुवारीच्या सुरुवातीला गारवा हळूहळू ओसरला आणि उन्हाचे चटके बसू लागले. तापमानाचे हे चित्र उन-पावसाच्या खेळासारखे ठरले. रात्री गारवा तर दिवसा मात्र उन्हाच्या झळा असे सध्याचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसात नाशिकच्या तापमानात ३ ते ४ अंशांनी वाढ झाली आहे. १ फेब्रुवारीला ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास असणाऱ्या तापमानाने पुढील १५ दिवसात ३४ अंशांचा टप्पा पार केला आहे. एव्हाना नाशिकचे किमान तापमान ११.४ तर कमाल तापमान ३४.२ अंशावर पोहोचले आहे. गतवर्षी कमाल तापमानाने ही पातळी २५ फेब्रुवारी रोजी गाठली होती, अशी माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये ही स्थिती असून उर्वरित धुळे, जळगाव व नंदुरबार भागातील वातावरण अधिक तापल्याचे दिसून येते. साधारणत: सकाळी ११ वाजेनंतर उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुपारी चटके बसु लागल्याने नागरिक घराबाहेर जाण्याचे टाळतात. त्याचा परिणाम बाजारपेठ व रस्त्यांवरील वर्दळ कमी होण्यात झाल्याचे लक्षात येते. उष्म्याचा सामना करणे अवघड होत असताना भारनियमन सुरू झाल्याने समस्येत आणखी भर पडली आहे. शहरात २ तास तर ग्रामीण भागात ६ ते १० तास भारनियमनही होत असल्याने सर्वसामान्यांच्या जिवाची काहिली होत आहे.
उन्हाळ्याची दाहकता कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून तयारी सुरू झाली आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर नेहमीप्रमाणे विविध कंपन्यांनी अनेक साधने बाजारात आणली आहेत. महागडय़ा वातानुकूलित यंत्रणा खरेदीसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. वातानुकूलीत यंत्र, पंखे, थंडगार पाण्यासाठी माठ, खिडक्यांना पडद्याप्रमाणे बसविल्या जाणाऱ्या वाळा तत्सम साधनांच्या खरेदीची चर्चा सुरू झाली आहे. प्रमुख चौकांत शीतपेय, आईस्क्रिम पार्लर, रसवंती अशा दुकानांवर गर्दी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव हा उच्चांकी तापमानाची नोंद होणारा जिल्हा. या भागातील तापमान एव्हाना ३२ अंशावर जाऊन पोहोचले आहे तर भुसावळमध्ये ३० अंशांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या जिल्ह्यात उष्म्याची लाट आली होती. त्यामुळे स्थानिक शासकीय रुग्णालयांमध्ये खास उष्माघात कक्षाची स्थापना करावी लागली होती. यंदाची तशीच स्थिती उद्भवणार असल्याची साशंकता जळगावकर व्यक्त करत आहे. सकाळपासून उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने दैनंदिन कामे करण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. उन्हामुळे दुपारी बाहेर पडणे शक्यतो टाळले जात असले तरी ग्रामीण भागात मात्र लग्नसराई अथवा विवाह सोहळ्यांच्या उपस्थितीवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नाही. ग्रामीण भागात शेतीसाठी सध्या केवळ आठ तास वीज दिली जाते. तथापि, मालेगावसह इतर तालुक्यांत केवळ पाच ते सहा तास वीज पुरविली जात असल्याने शेतीला पाणी देताना कसरत करावी लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

पाणी टंचाईचे मळभ
वाढत्या तापमानाने पाणी टंचाईचे संकट उभे ठाकणार आहे. धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग उन्हाळात वाढत असतो. परिणामी, जलसाठा कमी होऊन पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. शहरी भागात अद्याप टंचाई अजून जाणवत नसली तरी काही ग्रामीण भागात पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील ५०२० पैकी २९७९ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आढळून आली असून उपरोक्त गावांत टंचाई परिस्थिती आधीच जाहीर करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे धास्तावलेल्या शेतकरी वर्गासमोर आता दुष्काळाचे सावट उभे ठाकले आहे. पुढील काळात हे संकट अधिक बिकट स्वरुप धारण करणार असल्याची चिन्हे आहेत.