अवकाळी पावसाने इगतपुरी तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असताना उत्पादनात घट येण्याचा फटका परिसरातील मीलधारकांनाही सोसावा लागणार आहे. काढणीस सुरूवात होत असताना कोसळलेल्या नैसर्गिक संकटाने भाताच्या उत्पादनात ३० ते ३५ टक्के घट येण्याचा अंदाज आहे. त्याचा विपरित परिणाम भातावर प्रक्रिया करणाऱ्या राईस मीलवरही होणार आहे. ‘आडात नाही तर, पोहऱ्यात कुठून येणार’ अशी मीलधारकांची अवस्था आहे. अवकाळी पावसाने पिकाचा दर्जाही खालावल्याने निर्यात होण्याची शक्यता धुसर बनली आहे. एकंदर इगतपुरीचे आर्थिक चक्र गाळात रुतण्याच्या मार्गावर आहे.
मुसळधार पर्जन्यवृष्टी होणारा इगतपुरीचा परिसर भाताच्या उत्पादनासाठी प्रसिध्द आहे. लहान-मोठी जमीन बाळगणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे भात हे प्रमुख पीक आहे. यंदा विलंबाने आलेल्या पावसाने पुढील काळात बरिचशी कसर भरुन काढली. पण, परतीच्या वेळी त्याने हात आखडता घेतला. परतीचा पाऊस भातासाठी महत्वपूर्ण असतो. त्याने पाठ फिरविल्याने अखेरच्या टप्प्यात भाताचे पीक हवे तसे बहरले नाही. यामुळे पिकाला आधीच फटका बसला असताना ऐन हिवाळ्यातील पावसाने भात शेतीवर नांगर फिरविला आहे. वास्तविक, दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरपासून भात काढणीला सुरुवात होते. बहुतांश गावात काढणीचे काम एकतर सुरू झाले अथवा सुरू होण्याच्या मार्गावर होते. काहींचा शेतातून काढलेला भात खळ्यात ठेवला होता. चांगला भाव पाहून तो बाजारात नेण्याचे नियोजन सुरू होते. नेमक्या त्याच वेळी पाऊस कोसळला आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. सलग तीन ते चार दिवस पावसाचा मारा सुरू राहिल्याने ओंब्यांसह पीक आडवे झाले. शेतात पाणी साचल्याने पीक सडण्याची प्रक्रिया सुरू झाली. भाताचे दाणे पिवळे पडले. बहुतांश ठिकाणी हीच स्थिती असल्याने यंदा भाताचे उत्पन्न ३० ते ३५ टक्क्यांनी घटण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. गतवर्षी १०० पोते भाताचे उत्पादन करणारा शेतकरी यंदा किती पोती होतील हे देखील सांगण्यास धजावत नाही अशी स्थिती आहे.
भात शेतीवरील संकटाचा फटका घोटी परिसरातील मीलधारकांना बसणार आहे. इगतपुरी तालुक्यात भातावर प्रक्रिया करणाऱ्या ५२ राईस मील आहेत. अवकाळी पावसाच्या तडाख्यात मीलधारकही भरडला जाणार आहे. घोटी राईसमील असोसिएशनचे अध्यक्ष नवसुखलाल पिचा यांनी ही बाब मान्य केली. मजुरांचा तुटवडय़ाची समस्या मीलधारकांना भेडसावत आहे. त्यात हे नवीन संकट कोसळल्याने भाताच्या प्रक्रियेवर कमालीची घट होणार आहे. घोटीतील काही मीलधारक दरवर्षी हजारो क्विंटल तांदूळ परदेशात निर्यात करतात. पावसामुळे पिकाचा दर्जा खालावला आहे. यामुळे यंदा निर्यात होईल की नाही याबद्दल मीलधारकांनी साशंकता व्यक्त केली. काही मीलधारकांनी मोठी गुंतवणूक करत यंत्रसामग्री अद्ययावत करत प्रक्रिया क्षमता वाढविली.
यंदा उत्पादनात घट होणार असल्याने प्रक्रिया कशावर करणार, हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून मीलमध्ये भात येण्यास सुरुवात होते. मीलधारक वा व्यापारी शेतकऱ्यांकडून त्याची खरेदी करतात. मग, तो प्रक्रियेसाठी मीलमध्ये आणला जातो. ८० किलोवर प्रक्रिया करण्यासाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते. ही रक्कम शेतकऱ्यांना मोजावी लागते. यंदा नोव्हेंबरचा मध्य उलटून गेल्यावरही फारसा भात प्रक्रियेसाठी येत नसल्याचे चित्र आहे.

तांदुळ निर्यातीबद्दल साशंकता
अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट होईल, पण आहे त्या भाताचा दर्जाही खालावला जाणार आहे. गतवेळी १०० टन तांदूळ परदेशात आपण निर्यात केला होता. यंदा तांदळाची निर्यात करता येईल की नाही ते सांगता येत नाही. मध्यंतरी आपण मीलच्या यंत्रसामग्रीचे नुतनीकरण केले. प्रतीताशी दोन टन भातावर प्रक्रिया करण्याची मीलची क्षमता तीन टनपर्यंत वाढविली. अवकाळी पावसाने त्याचा काही लाभ होण्याची शक्यता धुसर बनली आहे.
सुरेश पिचा (राईस मीलधारक)

शेतकरी खड्डय़ात गेला..
२० एकरवरील भाताचे पीक काढणीवर आले होते. प्रारंभी भाव चांगला मिळाला तर बाजारात न्यायचा अन्यथा तसा भाव येईपर्यंत प्रतीक्षा करायची असे ठरवले होते. परंतु, अवकाळी पावसाने त्यावर पाणी फेरले. गतवेळी ५५० पोती तांदूळ झाला होता. यंदा पावसाने इतके नुकसान केले की, २०० पोती
तरी होतील का, याबद्दल साशंकता आहे. शेतकरी पुरता खड्डय़ात गेला आहे.
जनार्दन माळी, शेतकरी (काचनगाव)