कोकणात पडणारा अवकाळी पाऊस आणि त्यामुळे ऐन भरात आलेला मोहर गळून पडू लागला असल्याने यंदा हापूस आंब्याचा मोसम मागास झाला असून हापूस आंब्यावर अंवलंबून असणारी व्यापाऱ्यांची करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल कोलमडून जाणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. केवळ हापूस आंबा या एका फळावर तुर्भे येथील घाऊक फळबाजारातील मोसमातील उलाढाल ५० कोटींच्या घरातील आहे. त्यामुळे काल्टरचा वापर करून जानेवारीपासून बाजारात हापूस आंबा पाठविण्याची अहमहमिका करणाऱ्या बागायतदारांना मार्च महिना उजाडणार असल्याचे दिसून येत असून एकाच वेळी या महिन्यात कर्नाटक व कोकण हापूसची आवक वाढल्यास भाव घसरण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीस पडणारी थंडी महिना संपण्यास आला तरी दडी मारून बसली आहे. कोकणात या महिन्यात हुडहुडी भरावी अशी थंडी पडत असल्याचा अनुभव आहे. तीच थंडी हापूस आंब्याच्या मोहरासाठी पोषक मानली जाते. मात्र यंदा कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक अवकाळी पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहराला हा पाऊस धुऊन नेणार असल्याचे बागायतदारांचे मत आहे. त्यामुळे लवकर उत्पादन काढण्यासाठी केलेली फवारणीदेखील पावसात वाहून गेली आहे.
त्यामुळे हापूस आंब्याचा दुसरा मोहर येण्यास आता वेळ लागणार असून त्यानंतर फळधारणा होणार आहे. पहिला मोहर हा चांगले व मोठे फळ देणारा मानला जातो. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या मोहरावर अनेक व्यापारी बागा खरेदी करीत असल्याने यंदा त्यांचा फटका बागायतदारांना बसणार आहे. हापूस आंब्याचा मोसम मागास झाल्याने यंदा हापूस बाजारात १० मार्चनंतर खऱ्या अर्थाने येण्यास सुरुवात होणार असल्याचे आंबा व्यापारी विजय बेंडे यांनी सांगितले. आंबा मोसमात सरासरी ५० ते ६० लाख पेटय़ा हापूस कोकणातून येत असल्याचे दिसून येते. कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्यात आल्यानंतर कर्नाटक, गुजरात येथील हापूस आंब्याची आवक होत असते. यावेळी ही सर्व आवक एकाच वेळी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे एकाच वेळी हापूस आंब्याची आवक वाढल्यास ग्राहकांना स्वस्त दरात हापूस आंबा खाण्यास मिळेल पण बागायतदार व व्यापाऱ्यांचे गणित मात्र कोलमडून जाणार असे दिसून येते.