महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी आणि तलावांचे शहर अशी ख्याती असणाऱ्या ठाणे शहराच्या लौकिकास राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळवून देण्याच्या हेतूने १० ते १२ जानेवारीदरम्यान शहरातील उपवन या निसर्गरम्य परिसरात मुंबईतील काळा घोडा फेस्टिव्हलच्या धर्तीवर उपवन आर्ट फाऊंडेशनने खास कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ यांच्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवात उस्ताद झाकिर हुसेन यांच्यासह मेंडोलिनवादक यू. श्रीनिवासन, कंजिरावादक व्ही. सेल्वा गणेश, गायक रूपकुमार राठोड, रजनी-गायत्री, रशिद खान, पावर्थी बऊल, प्रल्हाद तिपानिया, जयतीर्थ मेवुंडी, व्हायोलिनवादक डॉ. एल. सुब्रह्मण्यम यांच्यासह शंभरांहून अधिक स्थानिक कलावंत सहा आकर्षक व्यासपीठांवरून आपली कला सादर करणार आहेत. सहा हजारांहून अधिक क्षमता असणारे प्रेक्षागृह उभारण्यात येणार आहे. उपवन तलाव परिसरातील एक किलोमीटरच्या परिघात विविध गृहोपयोगी वस्तूंचे ३०० हून अधिक स्टॉल्स असणार आहेत.  
विविध कलांचे व्यासपीठ
या महोत्सवात भरतनाटय़म्, यक्षगान, कथ्थकली, कथ्थक, मोहिनीअट्टम, कुचिपुडी, ओडिसी, गरबा, विविध लोककला, भारतीय लोककला यांसह नृत्याचे विविध प्रकार ख्यातनाम कलावंत सादर करणार आहेत. दृश्यकलांमध्ये चित्रकला, शिल्पकला आदींचे सादरीकरण होणार आहे. चित्रकार सुधीर पटवर्धन, सुनील गावडे, संचयन घोष, जी. जी. स्कारिया, प्राजक्ता पोतनीस आदी कलावंत त्यात भाग घेतील.
कौशल्यांचा शोध
सर्व वयोगटांतील आपले कलागुण सादर करण्यासाठी विविध स्पर्धा महोत्सवादरम्यान घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी उपवन तलाव परिसरात सहा व्यासपीठे उभारण्यात येणार आहेत. ११ ते १६, १७ ते २५ आणि २५ वर्षांपुढील अशा तीन गटांमध्ये विविध स्पर्धा होतील. प्रत्येक विभागातील सवरेत्कृष्ट सादरीकरणास २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे.
प्रदर्शन आणि कार्यशाळा
पारंपरिक कारागिरी, हस्तकला, वस्त्रप्रावरणे, विणकाम, भरतकाम, पॉटरी, सिरॅमिक अशा वैविध्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन, विक्री आणि प्रशिक्षण कार्यशाळा महोत्सवात असणार आहेत. तसेच ३० पेक्षा अधिक खाद्यपदार्थाचे स्टॉल्स महोत्सवात असतील. त्यात मऱ्हाटमोळ्या तसेच अन्य भारतीय खाद्यपदार्थाबरोबरच इटालियन, चायनीज, कॉन्टिनेंटल पदार्थ असतील.
बहुभाषिक शोभायात्रा
कॉस्मोपॉलिटन ठाणे शहराचे प्रतिनिधित्व करणारी बहुभाषिकांची शोभायात्रा हे या महोत्सवाचे ठळक वैशिष्टय़ असणार आहे. त्यात मराठी, बंगाली, गुजराती, राजस्थानी, पंजाबी, सिंधी, तामिळ, तेलगू, कन्नड आदी भाषिक ठाणेकर सहभागी होणार आहेत.