मेडिकल, मेयो आणि दंत महाविद्यालयाच्या समस्यांसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या एकाही स्थानिक पदाधिकाऱ्याला किंवा माजी आमदारांना आमंत्रित न करण्यात आल्याने गावित यांना राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा रोषाला सामोरे जावे लागले.
मेडिकलसह मेयो आणि दंत महाविद्यालयातील विविध समस्यांसंदर्भात लोकप्रतिनिधींच्या बैठकीला विदर्भातील सत्तापक्षातील मंत्र्यांसह आमदार आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना आमंत्रित करण्यात आले होते, मात्र सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला मेडिकल प्रशासनाने आमंत्रित केलेले नव्हते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची आधीच कल्पना दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री रमेश बंग किंवा गिरीश गांधी यांना तरी आमंत्रित केले जावे, अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनाही आमंत्रित न करण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रुग्णालयाच्या परिसरात डॉ. गावित यांचा निषेध करीत त्यांना धारेवर धरले. या संदर्भात अजय पाटील म्हणाले, डॉ. गावित सरकारमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री असले तरी ते प्रथम राष्ट्रवादीचे मंत्री आहेत. त्यामुळे पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणे गरजेचे होते. शासकीय रुग्णालयाच्या समस्यांसंदर्भात शहर राष्ट्रवादीने  अनेक निवेदन दिली, आंदोलने केली आहेत. त्यामुळे आम्हाला अनेक समस्यांबाबत चर्चा करायची होती. बैठक सुरू झाल्यानंतर डॉ. गावित यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना डॉ. गावित यांनी आमंत्रित केल्यावर झालेल्या चर्चेत लोकप्रतिनिधींच्या बैठकीला केवळ आमदारांना आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांनाच आमंत्रित करण्यात आले असल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले. त्यावर पाटील यांनी, काँग्रेसचे माजी आमदार एस. क्यू जमा, शिवसेनेचे नगरसेवक बंडू तळवेकर यांच्यासह जिल्हा परिषदेतील दोन सदस्य बैठकीला कसे उपस्थित होते, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर डॉ. गावित यांनी या संदर्भात मला काहीच माहिती नसल्याचे सांगून ही बैठक केवळ लोकप्रतिनिधींची असल्याचे सांगितले. काँग्रेसचे नेते एस. क्यू. जमा आमदार आहेत किंवा नाही, याची माहिती नसल्याची कबुलीही डॉ. गावित यांनी पदाधिकाऱ्यांना दिली. भडकलेल्या पदाधिकाऱ्यांना शांत करीत डॉ. गावित यांनी रुग्णालयातील समस्या संदर्भातील त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले आणि यापुढे होणाऱ्या बैठकींना राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आमंत्रित केले जावे, असे निर्देश मेडिकल प्रशासनाला देऊन ते सभागृहातून बाहेर पडले.