सुट्टीचे दिवस असल्याने उरण शहरातील वाहतूक कोंडीत भर पडली असून, शहरातून जे-जा करणारे, राहणारे तसेच खरेदीसाठी येणारे नागरिक त्रस्त झाले असून, शहरातील ही वाहतूक कोंडी वाढत असताना वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस मात्र नेमके याच वेळी गायब होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत.
अनेकदा वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत झाल्यानंतर पोलीस येतात, असाही अनुभव अनेकांनी व्यक्त केला आहे. मुंबई व नवी मुंबईनंतर औद्योगिकदृष्टय़ा वाढणाऱ्या उरण शहरातील नागरीकरण व व्यवसायही वाढला आहे.  चारचाकी वाहने दुकानाच्या दरवाजात उभी करून खरेदी करण्यात येत असल्याने अनेकदा उरण शहरात वाहतूक कोंडी होत आहे. तर दुसरीकडे गेली अनेक वर्षे वाहतुकीची समस्या असताना ती सोडविण्यासाठी उरण शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मात्र १२ वर्षांपासून प्रलंबीत आहे.