पुण्यातील माळणी गावात भूस्खलनामुळे शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अशा अनेक घटना घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन सक्षमीकरणाच्या घोषणा शासनाकडून केल्या जातात. मात्र विकासकामाच्या नावाखाली सुरू असलेल्या डोंगराच्या ऱ्हासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने या घटनांना निमंत्रण मिळते. उरण तालुक्यातील द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याला पोखरून विकासकांनी तेथे बांधकामे उभी केली आहेत. डोंगर पोखरल्याने पावसाळ्यात डोंगरावरील माती आणि दगड येथे वाहून येत असल्याने मोठय़ा प्रमाणात गाळ साचत आहे. डोंगराचा पायथा पोखरल्याने ही वेळ आली असतानाही येथे मोठय़ा प्रमाणात पोखरणे सुरू आहे. यामुळे या ठिकाणी माळणीची पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. याच बरोबर मोरा, भवरा आणि डाऊरनगरमधील डोंगराच्या कुशीत तसेच डोंगरावर वसलेल्या वस्त्यांनाही सततच्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
उरण तालुक्याची संरक्षण भिंत असलेल्या ऐतिहासिक द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याजवळील माती काढू नये, याकरिता उरणमधील नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे काही प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांनी स्थागिती देत माती काढणे बंद केले होते.
यानंतरही करंजा-उरण रस्त्याजवळ असलेल्या द्रोणागिरीच्या पायथ्याची माती काढून सपाटीकरण करण्यात आले आहे. या परिसरातील जमिनींची विक्री करून सिमेंटची पक्की घरे बांधली जात आहेत. मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे या परिसरातील डोंगराच्या पायथ्याची माती सरकू लागल्याने पायथ्याशी असलेल्या घरांना धोका निर्माण झालेला आहे. २००५ साली रायगड जिल्ह्य़ात झालेल्या दरडी कोसळण्याच्या घटनेत चार गावांतील दोनशेपेक्षा अधिकांना सर्वस्व गमवावे लागले होते. त्याच प्रमाणे उरण शहरातील मोरा, भवरा, डाऊरनगर परिसरातील अनेक घरे डोंगर उतारावर असून, या डोंगरावरून दरडी कोसळून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात उरणचे तहसीलदार चव्हाण यांनी एक पथक तयार करून, या परिसरातील स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, आवश्यकता भासल्यास येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.