उरणच्या खाडीकिनाऱ्यावर असलेल्या पाणजे परिसरात दर वर्षी ऑक्टोबर महिन्यापासूनच हजारो मैलांचा प्रवास करीत विदेशी फ्लेमिंगोसह देशी जातीचे असंख्य पक्षी येतात. मात्र या परिसरात सुरू असलेल्या खाडीतील मातीच्या भरावामुळे तसेच उद्योगनिर्मितीमुळे या पक्ष्यांची मूळस्थाने व पाणथळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ती संरक्षित करण्यासाठी एक प्रस्ताव उरण वनविभागाकडून  केंद्र शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती उरणच्या वनविभागाने दिली आहे.
सैबेरिया, तजाकिस्तान तसेच इतर देशांतून विविध जातींचे परदेशी पक्षी दर वर्षी भारतातील विविध ठिकाणी येत असतात. यांपैकी अनेक पक्ष्यांचे उरण परिसरात वास्तव्य असते. उरणमध्ये असलेल्या खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीत पक्ष्यांचे मुख्य खाद्य असलेले मासे, किडे, विविध जातींचे खेकडे यांचा मोठा साठा असल्याने मोठय़ा संख्येने पक्षी येथे येतात. त्यामुळे या विविध जातींच्या पक्ष्यांना न्याहाळणे, त्यांचा अभ्यास करण्याची संधी या परिसरात पुणे, मुंबई, ठाणे तसेच रायगड जिल्ह्य़ांतील पक्षीमित्रांना मिळत असते.
मात्र या परिसरात सुरू असलेल्या मातीच्या भरावमुळे खाडीचा भाग कमी होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे येथील पक्ष्यांचे खाद्य निर्माण करणारी खारफुटीही नष्ट होऊ लागली आहे. खाद्य कमी होत असल्याने खाडीकिनाऱ्यावरील पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. असे असले तरी पाणजे गावाला लागून अरबी समुद्र असल्याने येथील समुद्रकिनाऱ्यांवर दर वर्षी हजारो पक्षी येत आहेत. चार वर्षांपूर्वी याच परिसरात फ्लेमिंगोंची शिकार करून त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. त्यामुळे उरण परिसरात येणाऱ्या पक्ष्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असल्याचे मत पक्षीप्रेमी जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. तर या परिसरात असलेल्या उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमुळेही पक्ष्यांना अपघात होऊन पक्षी जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचीही घटना घडली आहे. यावर उपाययोजना म्हणून वन विभागाने सुरक्षा यंत्रणा उभारली आहे. मात्र या परिसरात होणाऱ्या भरावामुळे येथील पाणथळेच नष्ट झाल्यास पक्ष्यांची स्थानेही नष्ट होणार आहेत. ती टिकविण्याची व त्यांना संरक्षण देण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे.
याची दखल घेत उरणमधील विविध जातीच्या पक्ष्यांचे संरक्षण करून त्यांची मूळस्थाने टिकवून ठेवण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती उरण वन विभागाचे वनपाल सी. यू. मराठे यांनी दिली आहे. याकरिता पाणजे तसेच दास्तान फाटा येथील जागी सर्वात अधिक पक्षी जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळ पडल्यास या जमिनी संपादित करण्याचीही तयारी असून तशी तरतूद असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. त्यामुळे उरणमधील पक्ष्यांची मूळस्थाने सुरक्षित राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.