उरण तालुक्यातील देशातील पहिली नैसर्गिक वायूपासून वीजनिर्मिती करणारा वायू विद्युत प्रकल्प असून उरणमधीलच ओएनजीसीच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पातून वीज निर्मितीसाठी वायूपुरवठा केला जातो. काही वर्षांपासून ओएनजीसीकडून वीज निर्मिती प्रकल्पाला  पुरेशा गॅसचा पुरवठा होत नसल्याने क्षमता असूनही गॅस पुरवठय़ा अभावी वायु विद्युत केंद्रातील वीज निर्मिती निम्म्यावर आली आहे.तर दुसरीकडे केंद्र सरकारने गॅसच्या दरात वाढ केल्याने याचा फटका वीज दरवाढीलाही होणार असल्याची चिन्हे आहेत.
तेहतीस वर्षांपूर्वी ओएनजीसी तेल शुद्धीकरण प्रकल्पातील गॅसवर आधारित वायू विद्युत केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे. संपूर्ण जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या वायु विद्युत केंद्राची स्थापित क्षमता ९५२ मेगाव्ॉटची होती. मागील ३३ वर्षांत गॅसपासून वीजनिर्मित करणाऱ्या संचाची कार्यक्षमता कमी झाली आहे. त्यामुळे सध्या एकूण सहा संचातून ६७२ मेगाव्ॉट विजेची निर्मिती केली जाऊ शकते. त्यासाठी वायू विद्युत केंद्राला ३.५ सीएमएमडी इतक्या गॅसची आवश्यकता आहे.
प्रत्यक्षात मात्र १.८ सीएमएमडी गॅसचाच पुरवठा ओएनजीसीकडून होत असल्याने सध्या ३०० मेगाव्ॉटचीच वीजनिर्मिती होत असल्याची माहिती उरणच्या वायू विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मनोहर गोडवे यांनी दिली आहे. त्याच प्रमाणे गॅसचा पुरवठा वाढल्यास ४५० मेगाव्ॉट विजेचीही निर्मिती केली जाते. त्यामुळे जसा गॅसपुरवठा त्या प्रमाणात वीजनिर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच प्रमाणे या वायू विद्युत केंद्रात वीज निर्मितीसाठी गॅस जाळल्यानंतर होणाऱ्या वाफेपासून जे पाणी निर्माण होते त्यापासूनही वीजनिर्मिती केली जाते. त्याला वेस्ट हीट रिकव्हरी असे म्हटले जाते.
या प्रकल्पासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा करण्यासाठी गुजरातमधील हजिरा येथून थेट उरणच्या वायू विद्युत केंद्रापर्यंत गॅसची पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे.
या पाइपलाइनद्वारे रिलायन्सकडून गॅसपुरवठा केला जात होता. मात्र हा गॅसपुरवठाही बंद झाल्याने प्रकल्पाची क्षमता असूनही निम्म्यावर चालवावा लागत आहे. प्रकल्पाला गॅस पुरवठयासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आतापर्यंत राज्य सरकारच्या अनेक ऊर्जा मंत्र्यांनी दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तर मागील पंधरा वर्षांपासून भूमिपूजन करूनही प्रकल्पाचा विस्तार रखडला आहे.
गॅसची खरेदी डॉलरमध्ये करावी लागत असून सध्या गॅसचा दर ४.२ डॉलरवरून ५.५ डॉलर करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात सर्वात स्वस्त व प्रदूषण मुक्त असलेल्या वायूपासून निर्मित विजेचेही दर वाढण्याची शक्यता आहे.