अणुविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या धोक्यावर प्रकाश टाकणाऱ्या निवडक चित्रपटांचा ‘युरेनियम फिल्म फेस्टिव्हल’ मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. फिल्म्स डिव्हिजनतर्फे आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव मुंबईत फिल्म्स डिव्हिजनच्या सभागृहात १८ ते २० एप्रिल या कालावधीत होणार आहे.
१८ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १.१५ या कालावधीत दाखविण्यात येणाऱ्या सीमा बागेरी या इराणी दिग्दर्शिकेच्या ‘द लास्ट फ्लॉवर’ या अॅनिमेशनपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर पीटर ग्रीनवेचा ‘अॅटोमिक बॉम्ब ऑन द प्लॅनेट अर्थ’ आणि त्यानंतर ‘द न्युक्लिअर सॅव्हेज’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. याच दिवशी दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत ‘यलो केक’, ‘टेलिंग’ आणि ‘अॅटोमिक स्टेट ऑफ अमेरिका’ हा चित्रपट दाखविला जाणार आहे. दुपारी चार ते साडेसात या वेळेत भारतीय दिग्दर्शक श्री प्रकाश यांच्या ‘सुप्रीम फाईट-गेरे डान’ या इंग्रजी चित्रपटासह अन्य दोन चित्रपट दाखविले जाणार आहेत.
अन्य दोन दिवसात फुकुशिमा दुर्घटनेवरील ‘अबिटा चिल्ड्रेन फ्रॉम फुकुशिमा’,‘फोर्बिडन ग्राऊंड फुकुशिमा’, ‘टोकोयो बेली’, ‘विमन ऑफ फुकुशिमा’, ‘गेट अप स्टॅण्डअप’, ‘हाय पॉवर’, अणुप्रकल्पावरील ‘इंडियन पॉइंट नो व्हेअर’, ‘युरेनियम २३८- दे पेन्टेगॉन डर्टी टुल्स’, ‘द थर्ड न्युक्लिअर बॉम्ब’, ‘युरिज ओमेन’ आदी चित्रपटही दाखविले जाणार आहेत. रविवार, २० एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता होणाऱ्या चर्चासत्रात आनंद पटवर्धन, सत्यजित चव्हाण, दिलनाज बोगा, राजेंद्र फातरफेकर, विवेक सुंद्रा आदी सहभागी होणार आहेत. महोत्सवातील हे सर्व चित्रपट फिल्म्स डिव्हिजन, १० वा मजला, पेडर रोड येथे दाखविले जाणार आहेत. मुंबईसह अहमदाबाद, हैदराबाद, बंगलोर आदी ठिकाणीही हे चित्रपट दाखविले जाणार आहेत.