अंधश्रद्धेपायी प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा बळी देण्याची प्रथा फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. नागपूर शहरात अलीकडेच हा प्रकार उघडकीस आला असून, वन्यजीवप्रेमींच्या सतर्कतेमुळे ‘त्या’ पक्ष्याला जीवदान देण्यात यश आले. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकारावर र्निबध घालण्यात वनखाते सपशेल अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील लकडगंज या दाट वस्तीच्या भागात काही अंधश्रद्धाळू व्यक्तींनी गुप्तधनाच्या लालसेपायी एका कृष्ण घारीला पकडले. त्या घारीला पेट्रोल पाजून अर्धमेले करण्यात आले होते आणि तिची पूजा करून बळी देण्याचा घाट या व्यक्तींनी घातला होता. काही वन्यजीवप्रेमींच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी त्या व्यक्तींच्या कचाटय़ातून घारीला सोडवले, पण घारीला पेट्रोल पाजून मारण्याच्या तयारीत असलेल्या त्या व्यक्ती मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरल्या. लकडगंजमधून ही घार पक्षीमित्रांनी डॉ. सुशील पांडव यांच्याकडे आणली. डॉ. पांडव यांनी त्वरित वाईल्ड सीईआर या संस्थेचे डॉ. बहार बाविस्कर यांच्याशी संपर्क साधून घार संस्थेकडे सुपूर्द केली. घारीला पुढील उपचारासाठी संस्थेच्या अतिदक्षता विभागात दाखल केले गेले. तपासणीदरम्यान घारीला मोठय़ा प्रमाणात पेट्रोल पाजल्याचे लक्षात आले. एवढेच नव्हे तर हळद-कुंकू लावून तिची पूजाही करण्यात आली होती. अर्धमेल्या अवस्थेतील या घारीला दोन ते तीन दिवसानंतर शुद्धीवर आणण्यात यश आले. तरीही सुरुवातीचे काही दिवस घारीच्या विष्ठेतून पेट्रोल निघतच होते. सातत्याच्या उपचारानंतर घारीच्या तब्येतीत वेगाने सुधारणा झाली. तिच्यात उडण्याचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्नही या संस्थेने केला. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतरच तिच्या नैसर्गिक अधिवासात तिला परत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि नुकतेच तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडण्यात संस्थेला यश आले.
वन्यजीवप्रेमी या बाबतीत सतर्क असले तरी प्रत्येकवेळी अंधश्रद्धेचा बळी ठरणाऱ्या पक्ष्याला किंवा प्राण्याला जीवदान मिळेलच असे नाही. अंधश्रद्धा आणि गुप्तधनापोटी घार, घुबड, बेडूक आदी पक्षी आणि प्राण्यांचा बळी देण्याचे प्रकार गावखेडय़ातच नव्हे, तर नागपूरसारख्या शहरातही मोठय़ा प्रमाणावर होतात आणि असे प्रकार कित्येकदा वन्यजीवप्रेमींनी उघडकीस आणले आहेत. अंधश्रद्धेचा बळी ठरल्यामुळे घुबडांच्या कित्येक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. तरीही वनखात्याकडून या प्रकाराला आळा घालण्यासंदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलल्याचे ऐकिवात नाही. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास प्राणी आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका असल्याचे मत डॉ. बहार बाविस्कर यांनी व्यक्त केले.