मनसेचे आयुक्तांना निवेदन
जुन्या व पडीक विहिरींतील गाळ काढून शहराची पाण्याची गरज भागवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी अशा विहिरींतील उपसलेला गाळही कांबळे यांना प्रतीकात्मक स्वरूपात देऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
औरंगाबाद शहरात सुमारे २०० जुन्या व पडीक विहिरी असून, किमान १०० विहिरी पाणी असलेल्या आहेत. या विहिरींमधील गाळ काढून किमान सांडपाणी म्हणून वा बांधकामासाठी या पाण्याचा वापर केला, तरी पिण्याचे पाणी सांडपाणी म्हणून व बांधकामासाठी या काळात वापरले जाणार नाही. अशा प्रकारे सुमारे ४० टक्के जास्तीचे पाणी उपलब्ध होऊ शकते, असे कार्यकर्त्यांनी कांबळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भीषण दुष्काळाच्या सध्याच्या काळात केवळ जायकवाडीवर अवलंबून राहणे योग्य नाही. त्यामुळे वेगळय़ा पर्यायांचा विचार होणे क्रमप्राप्त ठरल्याचे कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणले.
या विहिरींमधील गाळ प्रतीकात्मक स्वरूपात काढण्यास मनसेच्या वतीने प्रारंभ केला असून, प्रशासनाने हे काम त्वरित हाती घ्यावे, यासाठी आपणास भेट देत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
 येत्या दहा दिवसांत याची कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन काळे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी व डॉ. शिवाजी कान्हेरे यांच्या निवेदनावर सहय़ा आहेत.