कला, सेवा आणि विचार प्रदान करणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना ‘उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट’च्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, पद्मविभूषण इब्राहिम अल्काझी, डॉ. विद्याधर ओक, ज. द. जोगळेकर आणि सुरेखा दळवी आदींना घोषित झाला असून ‘लोकसत्ता’, पुणे आवृत्तीचे संपादक मुकुंद संगोराम हे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
‘उत्तुंग सांस्कृ तिक परिवारा’चा १८ वा वर्षपूर्ती सोहळा रविवार, १७ मार्च २०१३ रोजी पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रांगणात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. याच सोहळ्यात उत्तुंग पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत. नाटय़तपस्वी, पद्मविभूषण इब्राहिम अल्काझी यांना ‘उत्तुंग कला योगदान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रूपये ५१ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांना ‘रसिकमणी श्रीकृष्ण पंडित स्मृती उत्तुंग जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
ठाणे येथील श्रुतिपंडित डॉ. विद्याधर ओक यांना ‘पु. ल. देशपांडे स्मृती उत्तुंग कला योगदान पुरस्कार’ तर स्वातंत्र्यवीर सावरकर तत्वज्ञानाचे अभ्यासक विचारवंत ज. द. जोगळेकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती उत्तुंग राष्ट्रविचार पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
 पेण येथील श्रमिक क्रांती संघटनाप्रमुख सुरेखा दळवी यांना ‘उमा महादेव उत्तुंग सेवाकार्य भाऊबीज पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मुकु ल डोंगरे आणि सत्यजीत तळवलकर यांची ‘तबला-ड्रम्स जुगलबंदी’ आणि आदित्य ओक-सत्यजीत प्रभूंची ‘जादूची पेटी’ हा संवादिनीच्या करामती दाखवणारा कार्यक्रमही सादर केला जाणार आहे.