कल्याणमध्ये शुक्रवारी कोसळलेल्या वालधुनी पुलाच्या कामाची चौकशी शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर विकास प्राधिकरण किंवा राज्य रस्ते विकास महामंडळातील वरिष्ठ अभियंत्यांमार्फत केली जाईल, असे आश्वासन महापालिका प्रशासनातर्फे महासभेत देण्यात आले.
काटेमानीवली-वालधुनी हा भाग जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम गेल्या पाच वर्षांपासून कोनार्क इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीमार्फत सुरू आहे. या पुलाचा काही भाग शुक्रवारी रात्री कोसळला. या पुलाच्या कामाबाबत शंका घेऊन नगरसेवक उदय रसाळ, दर्शना म्हात्रे, प्रमोद पिंगळे यांनी सभा तहकुबीची मागणी केली होती. महासभेत या विषयावर बोलताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठेकेदार कोनार्क कंपनी आणि त्यांचे सहकारी जयहिंद कन्स्ट्रक्शन यांना उड्डाणपूल उभारण्याचे अनुभव नाहीत. तरीही त्यांना हे काम पालिकेने दिले आहे, असा आरोप केला.