* या दिवशी केली जाते ‘मदन-रती’ यांची पूजा
* याच दिवसापासून सुरू होतो वसंतोत्सव
पाश्चिमात्य संस्कृतीमधील प्रेमिकांचा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ (१४ फेब्रुवारी) आणि भारतीय संस्कृतीमधील ‘कामदेव-रती’ या प्रेमिकांच्या जोडीतील कामदेव अर्थात मदन याचा जन्मदिवस म्हणजे ‘वसंत पंचमी’ ४६ वर्षांनंतर एकाच दिवशी आले आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.  माघ शुक्ल पंचमी म्हणजेच ‘वसंत पंचमी’ला मदनाचा जन्म झाला. या दिवशी ‘रती-मदना’ची पूजा केली जाते. भारतीय संस्कृतीत वसंतोत्सवाची सुरुवात याच दिवशी होत असते. यापूर्वी १९६७ मध्ये व्हॅलेंटाईन डे आणि वसंत पंचमी एकाच दिवशी आले होते. वसंत ऋतू आणि मदन यांचा घनिष्ठ संबंध असून दाम्पत्य जीवन सुखी व्हावे, त्यासाठी वसंत पंचमीच्या दिवशी ‘रती-मदना’ची पूजा केली जाते, असेही सोमण यांनी सांगितले.
वसंत पंचमीच्याच दिवशी  सरस्वती आणि लक्ष्मी यांचाही जन्म झाला, असे मानण्यात येते. संपूर्ण भारतात वसंत पंचमीचा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. सृष्टीतील नवचैतन्य आणि नवनिर्माण यामुळे या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा असल्याची माहितीही सोमण यांनी दिली.