जंगलातून मिळणारे मध, मोहफुले आदी वनोपजांच्या माध्यमातून तयार उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नागपूर वनखात्याने पुढाकार घेतला आहे. या उत्पादनांच्या विक्रीसाठी ‘वनधन-जनधन’ या नावाने राज्यातील पहिले दुकान सुरू करण्यात नागपूर वनखात्याने आघाडी घेतली आहे. एकीकडे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी केलेली धावपळ सार्थकी लागलेली असतानाच काही अधिकाऱ्यांची त्या विषयीची अनास्था मात्र उद्घाटनाच्या आड आली आहे.
मानव आणि वन्यजीव संघर्षांची दरी गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढलेली आहे. वन्यप्राण्यांचे गावकऱ्यांवर होणारे हल्ले आणि या हल्ल्यातून गावकऱ्यांची वन्यप्राण्यांना मारण्याची प्रवृत्ती, तसेच जंगलातील वनोपजांवर असलेला गावकऱ्यांचा हक्क आणि आता वनखात्याने त्यासाठी केलेली आडकाठी यातून वनखाते आणि गावकऱ्यांमधील अंतरसुद्धा प्रचंड वाढले आहे. ही दोन्ही अंतरे कमी करण्यासाठी वनखात्याने संयुक्त वनव्यवस्थापन समितीचा आधार घेतला. मध व मोहफुलांसारख्या वनोपजातून चांगली उत्पादने तयार करून आणि बाजारात त्याला विकण्यासाठी आकर्षक वेष्टन देण्यापर्यंतची कामे संयुक्त वनव्यवस्थापन समिती करीत आहे. गावकऱ्यांच्याच सहभागातून या समित्या स्थापन करण्यात आल्याने समितीच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांचा फायदा गावकऱ्यांनाच होत आहे. वनखात्याने या समित्यांना बळ देण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आणि या उत्पादनाला शहरी भागात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दुकान थाटण्याचा राज्यातील पहिला मान नागपूर वनखात्याने पटकावला.
नागपूर वनखात्याच्या आवारातच सोसायटीच्या जागेवर अनेक वर्षांंपासून कॅन्टीन सुरू करण्यात आले. वनखात्याच्या अर्थ व नियोजन विभागातर्फे संयुक्त वनव्यवस्थापन समितीसाठी निधीची तरतूद होती. कॅन्टीन आणि कॅन्टीनमध्ये असलेली जागा लक्षात घेऊन मुख्य वनसंरक्षक रामबाबू यांनी दुकानासाठी प्रस्ताव तयार केला. त्यांच्या विभागातर्फे निधी मंजूर करून तो नागपूर प्रादेशिक विभागाच्या सुपूर्द केला. सोसायटीची जागा आणि कॅन्टीनमध्येच दुकानासाठी जागा असल्याने केवळ आंतररचना बदलून त्याला दुकानाचे स्वरूप देण्यात आले. कॅन्टीन चालवणाऱ्या संदीप नायडू यांना काही टक्क्यांच्या आधारावर दुकानाची जबाबदारी देण्यात आली. मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनीही त्यासाठी मदत केली. गडचिरोली आणि इतर वनक्षेत्रातील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांशी करार करून त्यांची उत्पादने या ठिकाणी विक्रीसाठी आणण्यात आली. दुकान उत्पादनांसह सज्ज झाल्यानंतर रामबाबू यांनी प्रादेशिक खात्याचे उपवनसंरक्षक दीपक भट यांना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) ए.के. सक्सेना यांना उद्घाटनासाठी पाचारण करण्याची जबाबदारी सोपवली. मात्र, अजूनही उपवनसंरक्षक भट यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांना उद्घाटनाचे रीतसर निमंत्रणच दिले नसल्याचे कळते. त्यामुळे वनोपजापासून तयार झालेल्या उत्पादनांचे वनखात्याचे राज्यातील पहिले दुकान सज्ज असूनही या दुकानाला उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे नागरिकांनी मात्र उद्घाटनाआधीच या उत्पादनांची खरेदी सुरू केली आहे.
 या संदर्भात उपवनसंरक्षक दीपक भट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते संपर्क कक्षेच्या बाहेर असल्याचे सांगण्यात आले.