ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ांच्या सीमारेषेवरील वांगणी गावासाठी १९ कोटी रुपये खर्चाची पाणी योजना मंजूर झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे मध्य रेल्वेवरील बदलापूरनंतरचे स्थानक असणाऱ्या वांगणी गावाच्या शहरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकतेच या योजनेचे भूमिपूजन झाले.
सध्या अस्तित्वात असलेली ८० च्या दशकातील पाणी योजना झपाटय़ाने वाढणाऱ्या वांगणी गावासाठी अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे निम्म्या अधिक वांगणीकरांना बाराही महिने पाण्याचे दुर्भिक्ष सोसावे लागते. कूपनलिका आणि विहिरींवर त्यांना अवलंबून राहावे लागते. दुसरीकडे नागरीकरणाचा रेटा वांगणीच्या सीमारेषेपर्यंत आला आहे. बदलापूरनंतरचे स्थानक असल्याने अनेक बांधकाम व्यावयासिकांनी वांगणी परिसरात जागा घेऊन संकुले बांधण्याचे बेत आखले आहेत. मात्र पाणीच नसल्याने या सर्व योजनांना खीळ बसली आहे. शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीत वांगणी गावासाठी पाण्याचे आरक्षणही मंजूर आहे. मात्र योजना राबविण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने हा प्रकल्प रखडला होता. अखेर एका उद्योजकाने जागा दिल्याने पाणी योजनेचा मार्ग मोकळा झाला. योजना कार्यान्वित करण्यास दोन वर्षांचा कालावधी असला तरी तातडीची गरज लक्षात घेता हे काम युद्धपातळीवर हाती घेऊन एक ते दीड वर्षांत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.       
2