शहरात रविवारपासून संततधार असलेल्या पावसाचा जोर बुधवार दुपापर्यंत कायम होता. यामुळे सखल भागातील वस्त्या जलमय झाल्या. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेल्या वाऱ्यामुळे शहरात जवळपास दीडशेच्यावर झाडे कोसळली. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली. पडलेली झाडे तोडून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अग्निशमन दलाची संपूर्ण दिवसभर धावपळ सुरू होती. या कामात अग्निशमन दलाचे जवळपास दोनशेच्यावर जवान गुंतले होते. नागरी सुरक्षा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनीही मदतीचा हात पुढे केला.
दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने सायंकाळपर्यंत वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. दरम्यान, पुढील चोवीस तासात आणखी मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शहरातील नदी, नाल्याच्या काठावरील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
संततधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. काही नद्यांच्या पुलावरून पाणी वाहून जाऊ लागल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला काही बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्यात.
या पावसामुळे जनजीवनही विस्कळीत झाले असून अनेक बाजारपेठाही बंद बडल्या आहेत. त्यामुळे अनेकांचा रोजगारही बुडाला आहे.
बुधवारी सकाळपासून जोरात वारे वाहू लागल्याने शहरातील रेल्वे स्थानक परिसर, अलंकार चित्रपटगृह, टेका नाका चौक, टेलीफोन एक्सचेंज चौक, म्हाळगीनगर, सक्करदरा, सदर, सिव्हिल लाईन्स, पाचपावली, गोरेवाडा मार्ग, काटोल नाका, नंदनवन, हुडकेश्वर रोड, वर्धा रोड, खामला मार्ग, या महत्वाच्या मार्गासोबतच धरमपेठेतील कॅनाल रोड, झेंडा चौक, माऊंट रोड, यशोधरानगर, लेडीज क्लब, अंध विद्यालय, माता कचेरी परिसर, राजभवन, गणेशपेठ, पोलीस लाईन टाकळी येथे झाडे पडली आहेत.
दुपारी बारा वाजेपर्यंत झाडे पडण्याच्या घटनांमध्ये खंड नव्हता. त्यामुळे सकाळी ८ वाजल्यापासून अग्निशमन दलाच्या जवानांची तारांबळ उडू लागली.
एका ठिकाणचे झाड कापून होत नाही तोच दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे आदेश प्राप्त होऊ लागले. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मुख्य रस्त्यावरील झाडे कापून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य देण्यात आले. काही वस्त्यातील घरामंध्ये शिरलेले पाणी काढावे लागले.
अलंकार चित्रपट गृहाजवळ झाड पडले तेव्हा तेथून मोटारसायकलने (क्र. एमएच ३१/ डब्ल्यू/ ३८९४)दोघे जात होते. हे झाड त्यांच्यावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आज सकाळी एलआयसी चौकात झाड पडले. यावेळी या झाडाखाली शाळेत जाणारे विद्यार्थी व कर्मचारी उभे होते. झाड पडताना आवाज आल्याने ते दूर पळाले. त्यामुळे ही मुले व कर्मचारी थोडक्यात बचावले.  
जरीपटका परिसरातील स्नेहनगर, सीएमपीडीआय रोड, के.सी. बजाज कॉलेजच्या रेल्वे लाईनला लागून असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. त्याचप्रमाणे शाहू मोहल्ला, पाचमंदिर तसेच पाचपावली येथील पोलीस वसाहतीमधील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन शिरलेले पाणी बाहेर काढले.
तत्पूर्वी नागरिकांनीच आपल्या घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. रामेश्वरी, पार्वतीनगरात दिवसभर पाणी साचून होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होऊन गेले. यशोधरानगरातील मेहबूबनगरातून वाहणाऱ्या नाल्यातून दिवसभर पाणी वाहत होते. येथे कठडे नसल्याने धोका निर्माण झाला. मुसळधार पावसाचा फटका खामला येथील व्यंकटेशनगरालाही बसला. या भागात पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाली नसल्याने लोकांच्या घरात पाणी शिरले. चिंचभवन परिसरातील नालाही तुडूंब भरला आहे. या भागातील रस्त्यावर पाणी साचल्याने वस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले. फ्रेन्डस कॉलनी परिसरातही पाणी साचले आहे. या परिसरात अनेक नवीन ले-आऊट टाकण्यात आले आहेत. त्यापैकी काही ठिकाणी अजूनपर्यंत पक्के रस्ते तयार झाले नाहीत. त्यामुळे अनेकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
नेहमीप्रमाणेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रेकार्डरुममध्येही पाणी शिरले. त्यामुळे अनेक महत्त्वाचे दस्तावेज भिजले. सततच्या पावसाचा फटका प्रतीक्षालय, आकस्मिक कक्ष, औषध भांडार कक्ष व तळमजल्यावरील स्त्रीरोग वॉर्डालाही बसला आहे. कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौक ते पिवळी नदी परिसरातपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. या खड्डय़ात पाणी साचल्याने किरकोळ अपघात होत आहेत. बाबा दीपनगर, तसेच पार्वतीनगर, नमकगंज पोलीस चौकी, शांतीनगर हनुमान मंदिर परिसर, याशिवाय हुडकेश्वर, प्रतापनगर, गोपाळनगर, सोनेगाव, बेसा, वंजारीनगर, विश्वकर्मानगर येथील अनेक सखल वस्त्यांमध्ये पाणी साचले असल्याने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.
बुधवारी दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिक घराबाहेर पडू लागले. सततच्या पावसामुळे एसटी महामंडळाला आपल्या काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
यात रामटेक, भंडारा, तुमसर, तसेच अरोली-कोदामेंढी, चिमूर, भिसी, या गाडय़ांचा समावेश आहे. पावसामुळे शहरातील अनेक भागाचा वीज पुरवठा बंद पडला. स्पॅन्को कंपनी व महावितरणचे कर्मचारी हा पुरवठा सुरूकरण्याच्या कामात दिवसभर व्यग्र होते.