वडील मालेगावमधील एका हॉटेलमध्ये वेटर..हॉटेलमधील कामाची मिळकत ती कितीशी..
या मिळकतीतून रोजचा खर्च निघण्याची मारामार, मग महिना कसा काढणार..पैसा नसल्याने स्वप्निलच्या शिक्षणाची आबाळ होणार हे लक्षात आल्यावर तो तीन वर्षांचा असतानाच दिले नाशिकमध्ये त्यांच्या मामाकडे पाठवून..तेव्हांपासून तो मामांकडेच राहत आहे. थोडी समज आल्यापासून तो मैदानावर घाम गाळतोय..उद्देश एकच..वडील आणि मामांवर पडलेला वाढता भार हलका करण्यासाठी गरीबीला कायमचा ‘खो’ देण्याचा..
ही कथा आहे अजमेर येथे झालेल्या ३४ व्या राष्ट्रीय कुमार खो-खो स्पर्धेत आक्रमण आणि संरक्षण यांचे सुरेख प्रदर्शन करत महाराष्ट्राच्या विजेतेपदात महत्वपूर्ण वाटा उचलण्यासह स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा ‘वीर अभिमन्यू पुरस्कार ’ प्राप्त करणाऱ्या स्वप्निल दत्तू चिकणे याची. अर्थात खेळाच्या मैदानावर शरीरास कोणतीही इजा पोहोचू नये यासाठी जपणाऱ्यांच्या ‘नाजूक’ जगापासून दूर असणाऱ्या कोणत्याही खो-खो खेळाडूची ही प्रातिनिधीक कथा म्हणावी लागेल. याआधी उत्तर महाराष्ट्रातून धुळ्याच्या पंढरीनाथ बडगुजरने १९८९-९० मध्ये तर नीलेश मेमाणेने २००१-०२ मध्ये हा पुरस्कार प्राप्त केला आहे.
पंचवटीतील घराजवळच असणाऱ्या श्रीराम विद्यालयात स्वप्निल जाऊ लागल्यावर अभ्यासापेक्षा मैदानावर रंगणाऱ्या खो-खो कडे तो आकर्षित झाला. मैदानावरील ‘खो’ आवाज त्याच्या कानात घुमू लागला. सराव पाहण्यात तो रमू लागला. त्याची आवड पाहून क्रीडा शिक्षक उमेश आटवणे हे त्यालाही शिकवू लागले. खो-खो च्या वेडामुळे स्वप्निलचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन इयत्ता पाचवीत पहिल्या घटक चाचणीत तो सर्व विषय नापास झाला. आटवणे सरांना त्याची ही ‘प्रगती’ कळल्यावर सर्व विषय पास होईपर्यंत सराव बंद अशी त्यांनी तंबी दिली. त्यामुळे झपाटल्यागत त्याने अभ्यास सुरू केला. त्याचे फळ म्हणजे दुसऱ्या घटक चाचणीत सहापैकी चार विषय पास. तो पुन्हा आटवणे सरांकडे गेला. दोनच विषय राहिल्याचे सांगितले. अखेर त्याच्या जिद्दीपुढे सरांनाही झुकावे लागले. दररोजच्या सरावाव्यतिरिक्त स्वप्निल स्वत: एकटय़ाने सराव करू लागला. इतरांपेक्षा स्वप्निलकडे असणारे कौशल्य आणि वेग यामुळे सरही प्रभावित झाले. त्याच्या खेळातील बारीकसारीक त्रूटी दूर करण्याकडे लक्ष देऊ लागले. स्वप्निल एक खेळाडू म्हणून विकसित होऊ लागला. इतर खेळाडूंवर त्याचा प्रभाव पडू लागला. २०११-१२ मध्ये सर्वप्रथम त्याची १९ वर्षांआतील शालेय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली. त्यानंतर संघटनेच्या वतीने आयोजित १८ वर्षांआतील राष्ट्रीय स्पर्धेत मात्र त्याला थेट अंतिम खेळाडूंमध्ये स्थान मिळाले.
इतर प्रस्थापित खेळाडूंकडून काय शिकता येईल, याचेही तो स्पर्धेदरम्यान निरीक्षण करत असे. शिर्डी येथील १९ वर्षांआतील राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरीने तो ठसठशीतपणे सर्वासमोर आला. व्यावसायिकपणा पुरता अंगी भिनलेल्या मुंबई, पुण्यातील खेळाडूही स्वप्निलच्या खेळातील बिनधास्तपणाकडे आकर्षिले गेले. एकप्रकारे स्वप्निलचा दबदबाच निर्माण झाला होता.
या दबदब्याचे प्रतिबिंब यावर्षी अजमेरच्या राष्ट्रीय स्पर्धेत दिसले. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून पुरस्काराच्या स्पर्धेत मुंबई उपनगरचे अनिकेत पोटे व सागर घाग हे दोघेही होते.
परंतु त्यानंतर चित्र स्पष्ट झाल्याने त्यांनीही स्वप्निलला पूरक अशीच भूमिका घेतली. त्यामुळे सूसाट सुटलेल्या स्वप्निलने महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यासह सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा बहुमानही मिळविला. गोवा, तामिळनाडू, दिल्ली, पाँडेचेरी, विदर्भ, पश्चिम बंगाल, कर्नाटक या संघाविरूध्द म्हणजेच सात सामन्यात २४ गडी बाद आणि २४ मिनिटे २० सेकंद संरक्षण अशी त्याची कामगिरी राहिली. या कामगिरीने वडील दत्तू, आई निर्मला, दहावीत शिकणारा भाऊ विशांत, सातवीत जाणारी बहीण प्रियंका, मामा भरत गुंजाळ यांसह घरातील  सर्वच जण आनंदित आहेत.  
दररोज सकाळी दोन तास आणि सायंकाळी तीन तास सराव करणारा स्वप्निल खो-खो मधील आपल्या आतापर्यंतच्या वाटचालीचे श्रेय प्रशिक्षक उमेश आटवणे तसेच सतत प्रोत्साहनाची भूमिका घेणारे नाशिक जिल्हा संघटनेचे सचिव व राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख यांना देतो. तर, आटवणे सर हे याचे श्रेय त्याच्या आजीला देतात. आईवडिलांपासून दूर असलेला स्वप्निल खरोखर शाळेच्या मैदानावरच जातो की नाही याची खातरजमा करण्यासाठी सुरूवातीला त्या थेट मैदानापर्यंत येत. सरांना भेटत. आजींच्या या चौकस वृत्तीचे दडपण स्वप्निलपेक्षा सरांवरच अधिक येऊन ते स्वप्निलवर अधिक लक्ष देऊ लागले.
‘स्वप्निल खेळाचा पुरेपूर आनंद घेतो. बिनधास्तपणे खेळतो. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेचे सामने मॅटवर असतानाही किंचित वेग कमी होण्याव्यतिरिक्त त्याच्या खेळावर फारसा फरक पडला नाही..’ असे निरीक्षण आटवणे सरांनी नोंदविले. स्वप्निलच्या कामगिरीबद्दल लायन्स क्लबने सत्कार करून त्याचा यापुढील शिक्षणाचा सर्व खर्च करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सध्या ज्या पंचवटी महाविद्यालयात स्वप्निल प्रथम वर्ष कला शाखेत शिकत आहे, आणि स्वप्निलच्या नेतृत्वाखाली आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत प्रथमच विजेतेपदाचा मान मिळालेल्या पंचवटी महाविद्यालयाने त्याच्या कामगिरीची केवळ औपचारिक दखल घेण्याचे काम केले आहे. भविष्यात ‘प्रो खो-खो’ स्पर्धा सुरू होऊन स्वप्निलभोवती स्टारपदाचे वलय निर्माण होण्याची कदाचित ते वाट पाहात असावेत.