हिमाचल प्रदेशातून येणारा वाटाणा आणि बंगळुरूमधील टॉमटो वगळता भाज्यांचे भाव स्थिरावले असून श्रावणात पसंतीला उतरणाऱ्या पालेभाज्यांचे भावदेखील खाली आले आहेत. मागील आठवडय़ात राज्यातील विविध भागांत पडलेल्या पावसामुळे भाज्यांची लागवड वधारली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर कमी होण्यास मदत झाली असली तरी चढय़ा भावाच्या संधीचे सोने करणारे किरकोळ विक्रेते ग्राहकांची लूट करताना दिसत आहेत. पुढील आठवडय़ात सासवड आणि बेळगावहून येणाऱ्या श्रावणी वाटाण्यानंतर हे भाव आणखी कमी होण्याची शक्यता घाऊक बाजारात व्यक्त केली जात आहे.
रविवारी बंद असलेल्या भाजी बाजाराने सोमवारी उसळी घेतली असून ६०१ गाडय़ा भरून भाजी तुर्भे येथील एपीएमसीच्या घाऊक बाजारात आली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या एमएमआरडीए विभागाला ५०० ते ५५० ट्रक-टेम्पो भरून भाजी दररोज लागत असल्याने ही आवक मागील आठवडय़ातही गरज भागवणारी होतीे. त्यामुळे भावाची पन्नाशी गाठणारी भाजी आता तिशीवर स्थिरावली आहे. त्यात श्रावण महिन्यात सर्वाधिक पसंत असलेल्या पालक, मेथी, कोथिंबीर यांचा दरही कमी झाला आहे. कोथिंबिरीच्या एका नाशिक जुडीने मागील महिन्यात साठी गाठली होती, ती आता ४० रुपये झाली आहे. पालक चार रुपये जुडी आहे. वरुणराजा बऱ्यापैकी राज्यावर बरसल्याने भाज्यांचे दर आणखी कमी होण्याचा विश्वास भाजी व्यापारी व्यक्त करीत आहेत, पण या भाववाढीवर किरकोळ विक्रेत्यांना लगाम घालण्याची मागणी गेली कित्येक वर्षे होत आहे. त्यावर शासन लक्ष देत नसल्याने ही भाववाढ कायम असल्याचे चित्र निर्माण होते.