गेल्या काही दिवसांपासून शहर-परिसरात वाहनचोरीचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांत वेगवेगळ्या घटनांमध्ये कारसह दोन मोटारसायकल्स चोरीस गेल्या आहेत. वाहनचोरीच्या वाढत्या प्रकारांनी नागरिक त्रस्त असताना पोलिसांकडून सारे काही आलबेल असल्याचा दावा केला आहे.
नवीन पंडित कॉलनी परिसरात प्रसाद अपार्टमेंटच्या आवारात रविवारी रात्री नितीन वडनेरे यांनी आपली स्विफ्ट कार वाहनतळात उभी केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी ती चोरून नेल्याची तक्रार वडनेरे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. दुसरी घटना अंबड येथे घडली. जिजामाता हौसिंग सोसायटीच्या वाहनतळात सुभाष कुमावत यांनी आपली दुचाकी उभी केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी ती लंपास केली. याबाबत कुमावत यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
जेलरोड परिसरात या घटनेची पुनरावृत्ती घडली. प्रतीक आर्किड सोसायटीच्या आवारातून मोटारसायकल अज्ञात चोरटय़ाने लंपास केल्याची तक्रार विनोद भालेराव यांनी केली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही महिन्यांमध्ये चोरीला जाणाऱ्या वाहनांची संख्या पाहिल्यास हा आलेख कसा झपाटय़ाने वाढत आहे हे लक्षात येते. वाहनचोरीचे प्रकार दिवसागणिक वाढत असताना दुसरीकडे ते रोखण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.