ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूककोंडी कमी व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या रबाळे ते महापे या सव्‍‌र्हिस रोडवर घणसोली येथील रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारावरील रांगा आजही कायम आहेत. पालिकेचा सव्‍‌र्हिस रोड खासगी वाहनांसाठी आंदण अशा बातमीनंतर दोन दिवस या मार्गावरील खासगी वाहनांवर जुजबी कारवाई करण्यात आली. खैरणे येथील शेवरलेट कंपनीच्या २०० गाडय़ा हटविण्यात आल्या मात्र रिलायन्सच्या ट्रॅवल्स कंपनीच्या रांगा कायम आहेत.
ठाणे-बेलापूर मार्गावर दिवसाला होणारी एक लाख वाहनांची वाहतूक लक्षात घेऊन एमआयडीसी भागात जाणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून पालिकेने तीस कोटी रुपये खर्च करून एक चांगला रस्ता बांधला आहे. त्याचा उपयोग सध्या रिलायन्ससाठी काम करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स गाडय़ा करीत असून भली मोठी रांग या मार्गावर दिसत आहेत. महामुंबई वृत्तान्तने याला वाचा फोडल्यानंतर येथे वाहतूक पोलिसांनी जुजबी कारवाई केली.
दोन दिवस गाडय़ांना हटविण्यात आल्यानंतर स्थिती पूर्वीसारखी आहे. दरम्यान वाहतूक विभागाने या मार्गावर वाहने उभी करू नयेत याची अधिसूचना काढली असून जनतेच्या हरकती मागविल्या आहेत. चार दिवसांनी त्याची मुदत संपल्यानंतर या मार्गावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान हा रस्ता अद्याप वाहतुकीसाठी पूर्ण खुला झालेला नाही. तो येत्या आठवडय़ात होईल असे कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी स्पष्ट केले.