साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भालचंद्र विश्वनाथ जोशी (८०) यांचे मंगळवारी सकाळी नाशिकरोड येथील निवासस्थानी निधन झाले.
भा. वि. जोशी यांच्या पश्चात तीन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. ११ डिसेंबर १९३५ रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले जोशी यांनी अलीकडेच आपला ७९ वा वाढदिवस मित्रपरिवार आणि विद्यार्थ्यांच्या वतीने साजरा करण्यात आला. आर्थिकदृष्टय़ा तसेच मागास वर्गातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी १९६१ मध्ये जोशी यांनी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.
प्रारंभी नाशिकरोड येथे आठवीचा एकच वर्ग सुरू करण्यात आला. परंतु जोशी हे शिक्षणप्रेमी असल्याने जिद्द न सोडता अथक परिश्रमातून आणि सामाजिक पाठिंब्यातून त्यांनी संस्थेचा हळूहळू विस्तार केला. आज जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्थांमध्ये साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाची गणना केली जाते. संस्थेची जिल्ह्यात सात माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये आहेत. एक वरिष्ठ महाविद्यालय, तीन प्राथमिक शाळा, तीन इंग्रजी माध्यमच्या प्राथमिक शाळा असा संस्थेचा पसारा वाढला आहे.
आयुष्यभर जोशी यांनी शिक्षण क्षेत्रास वाहून घेतले. शिक्षक संघटनांमध्येही जोशी यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. जिल्ह्यात माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शिक्षण संस्था चालक संघटनेचे सचिव म्हणूनही ते कार्यरत होते. जोशी यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना अनेक संस्था व संघटनांनी पुरस्कार देऊन गौरविले आहे. त्यांच्या निधनामुळे शहरातील एक सेवाभावी शिक्षणतज्ज्ञ हरपल्याची भावना शैक्षणिक क्षेत्रात व्यक्त होत आहे.