डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या दिमतीला सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. डॉ. पांढरीपांडे यांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली असताना कुलगुरूंना मात्र पोलीस संरक्षण घ्यावे लागले आहे.
विद्यापीठानेच पोलीस आयुक्तालयाकडे या बाबत रीतसर मागणी केली होती. पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी त्याची गभीर दखल घेत किशोर वाघमारे या पिस्तूलधारी पोलिसाला डॉ. पांढरीपांडे यांच्या संरक्षणासाठी पाठविले आहे. विद्यापीठात वेगवेगळ्या संघटना, व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मागण्या, प्रश्न घेऊन मोर्चे, आंदोलने वगैरे करीत असतात. या संदर्भात कुलगुरूंना भेटून निवेदन देण्याची विविध कार्यकर्त्यांची इच्छा असते. अनेकांची ही इच्छा पूर्ण होते. मात्र, अलीकडच्या काळात मागण्यांसाठी रेटा लावताना कुलगुरूंना उद्देशून असभ्य शेरेबाजी करून धमकावण्याचे प्रकारही वाढले आहेत. कुलगुरुपदाचा अवमान करण्याच्या प्रकारांमुळे विद्यापीठात व शैक्षणिक वर्तुळातही संतापाचे वातावरण निर्माण झाले. या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाकडून पोलीस आयुक्तालयास रितसर पत्र पाठवून कुलगुरूंना पोलीस संरक्षण देण्याची विनंती करण्यात आली होती. त्याची पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी गंभीर दखल घेत गेल्या काही दिवसांपासून कुलगुरू डॉ. पांढरीपांडे यांना सशस्त्र (पिस्तूलधारी) पोलिसाचे संरक्षण दिले आहे. कार्यकाळ संपण्याच्या टप्प्यात पोलीस संरक्षण घेऊन कारभार करण्याची वेळ डॉ. पांढरीपांडे यांच्यावर या निमित्ताने आली आहे.