गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या विदर्भातील जलसाठा वेगाने घटत असल्याने आता पाणी टंचाईच्या किंबहुना भीषण दुष्काळाच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेले तीन-चार महिने विदर्भाला अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपिटीने त्रस्त केले. फेब्रुवारी व मार्च महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने थैमान घातले. त्यात जीवित व वित्तहानी भरपूर प्रमाणात झाली. यंदा केवळ फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे नागपूर विभागातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर व भंडारा या सहा जिल्ह्य़ांतील १३०१२२.२१ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली असून २ लाख, २० हजार, ४६६ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला. मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला असला तरी यंदाचा उन्हाळा विदर्भाला तापदायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा उकाडय़ात वाढ झाली आहे. पुन्हा उन्हाचा तडाखा जाणवायला लागला आहे. विदर्भातील विविध जिल्ह्य़ात सरासरीच्या तुलनेत जास्त तापमान नोंदवले जात आहे. तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. प्रखर उन्हाळामुळे लोक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. रणरणत्या उन्हामुळे रस्त्यांवर दुपारी सामसुन दिसते. विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, वाशीम, यवतमाळ आदी प्रमुख शहरांमध्ये तापमानात वाढच होत आहे. त्यामुळे विदर्भातील विविध जलाशयांमधील पाणीसाठाही कमी होत आहे.
विदर्भात ३१० लघु, ४० मध्य व १६ मोठे प्रकल्प आहेत. पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या जलाशयांमधील साठा कमी होऊ लागला आहे. मोठय़ा प्रकल्पात गेल्या महिन्यात सरासरी १८४८ दशलक्ष घनमीटर, मध्यम प्रकल्पात १९६ दशलक्ष घनमीटर पाणी होते. दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने घेतलेल्या नोंदीत दहा टक्के साठा कमी झाला असल्याचे उघड झाले. नागपूर जिल्ह्य़ातील तोतलाडोहमध्ये सहा, रामटेकमध्ये चार तर वेणामध्ये आठ टक्के पाणी कमी झाले आहे. नागपूर जिल्ह्य़ातील मध्यम तेरा प्रकल्पात गेल्या महिन्यात ३५ टक्के पाणी होते. या महिन्यात तीस टक्के पाणी असल्याचे स्पष्ट झाले. मोठय़ा प्रकल्पापेक्षा मध्यम व लहान प्रकल्पातील पाणी साठा वेगाने कमी होत असून भविष्यातील दुष्काळाचे हे संकेत तर नाही ना, अशी शंका निर्माण झाली आहे.