विधानसभा निवडणुकीत मतदान करता येईल, या आशेने यादीत नावनोंदणीसाठी मंगळवारी आपल्या घराजवळील मतदान केंद्रांवर गेलेल्या अनेकांच्या पदरी निराशाच पडली. एकाही केंद्रांवर नावनोंदणीची व्यवस्था नव्हती. केवळ शनिवार व रविवार असे दोन दिवस ही नोंदणी करणारे कर्मचारी केंद्रात येत असल्याचे सांगण्यात आले, तर १७ सप्टेंबर ही अंतिम तारीख असल्याचे अनेक बूथस्तरीय कर्मचाऱ्यांना ज्ञात नव्हते. सर्वच ठिकाणी ही स्थिती असल्याने मतदानाची प्रबळ इच्छा असणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घ्यावी लागली. दुसरीकडे ही नोंदणी मतदान केंद्रावर होईल, असे जाहीर करण्यात आले नसल्याचे निवडणूक शाखेने म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या १० दिवस आधी म्हणजे १७ सप्टेंबपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविण्याची विशेष मोहीम राबविली जात आहे. या मुदतीत नावनोंदणी करणाऱ्या व्यक्तीची विहित छाननी प्रक्रिया पूर्ण करून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यात येणार आहे. या माध्यमातून संबंधितास विधानसभा निवडणुकीच्या मतदानात आपला हक्क बजाविता येईल. या मुदतीनंतरही नोंदणीचे काम सुरू राहणार असले तरी त्यांना यंदाच्या मतदानात सहभागी होता येणार नाही.
या पाश्र्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने ज्यांनी मतदार यादीत नावनोंदणी केलेली नाही, त्यांनी बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन केले. घराजवळील तसेच लोकसभा निवडणुकीसाठी जे मतदान केंद्र होते, त्या ठिकाणी बूथस्तरीय अधिकाऱ्यांकडे ही नावनोंदणी करता येईल, असा बहुतेकांचा समज झाला. अंतिम मुदतीच्या आदल्या दिवशी सकाळपासून नोंदणीसाठी इच्छुक असलेल्यांची धावपळ सुरू झाली, पण घरालगतच्या अनेक केंद्रांवर मंगळवारी या स्वरूपाची व्यवस्था नसल्याचे लक्षात आले. राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूल, राजीवनगर येथील शारदा शाळा, गंगापूर रस्त्यावरील वाघ गुरूजी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शासकीय कन्या विद्यालय अशा अनेक ठिकाणी नोंदणीसाठी काही व्यवस्था नसल्याचे पाहावयास मिळाले.  यामुळे अनेकांची धावपळ उडाली. अखेरीस काहींनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन नावनोंदणीला प्राधान्य दिले. शेकडो नागरिक सकाळपासून मतदार यादीत नावनोंदणीसाठी जमा झाले होते. यामुळे त्यांचे व्यवस्थापन करताना मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली.

नोंदणी केवळ मतदार मदत केंद्रावरच
लोकसभा निवडणुकीच्या मतदान केंद्रांवर यादीतील नावनोंदणीचे काम होईल, असे निवडणूक शाखेने जाहीर केलेले नव्हते. हे काम केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदार मदत केंद्र तसेच जिल्हाभरातील त्या त्या मतदारसंघातील तहसीलदार कार्यालयात केले जाणार असल्याचे निवडणूक शाखेने जाहीर केले आहे. ३१ जुलैनंतर निरंतर प्रक्रियेत आठ हजार मतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
– गीतांजली बाविस्कर
उपजिल्हाधिकारी (निवडणूक शाखा)