राज्यात आता भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ता स्थापन होणार असून त्यात नागपूर जिल्ह्य़ातून कुणाची वर्णी लागते, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
नागपूर जिल्ह्य़ात १२ पैकी ११ जागांवर भाजपचे आमदार निवडून आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे तर मुख्यमंत्र्यांच्याच शर्यतीत आहेत. याबाबतीत अंतिम निर्णय वरिष्ठच घेणार आहे. पूर्व नागपूरमधून कृष्णा खोपडे हे निवडून आले तर ते मंत्री बनतील, असे वक्तव्य प्रचारादरम्यान नेते करीत होते. तसेच वक्तव्य विकास कुंभारे यांच्याबाबतीतही केले जात होते. मंत्रीपदात स्वारस्य नसून एक सामान्य कार्यकर्ता राहणेच आपल्याला आवडेल, असे ते सांगत आहे, तरी या दोघांपैकी एकाला विशेषत: कृष्णा खोपडे यांना लाल दिवा मिळू शकते, असे भाजपच्याच वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्यांदा कामठी मतदारसंघातून निवडून आलेले चंद्रशेखर बावनकुळे, प्रथमच निवडून आलेले आशिष देशमुख, यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. बावनकुळे यांना आरोग्य राज्यमंत्री तर आशिष देशमुख यांना क्रीडा राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, असेही भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.
चार वर्षांंपूर्वी भाजपने अभिरूप मंत्रिमंडळाची यादी तयार केली होती. त्यात जिल्ह्य़ातून देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि कृष्णा खोपडे यांचे नाव होते.
विशेष म्हणजे, या नावाला पक्षातून कुणाचाही विरोध नाही. त्यामुळे त्यांचे नाव पक्के समजले जात आहे.