विविध राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांंनी बंडखोरी करीत पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवली असली तरी त्यांना यश न मिळाल्याने आता बंडोबा तुर्तास तरी शांत झाल्यामुळे पुन्हा स्वगृही परत जातात की दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात याकडे आता लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी घोषित केल्यानंतर पक्षातील निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे असे निष्ठावंत बंडखोरी करीत निवडणुकीच्या मैदानात उतरले. दक्षिण नागपूर मतदारसंघात शिवसेनेचे शेखर सावरबांधे बंडखोरी करीत मैदानात उतरल्यावर त्यांनी १५ हजार १०७ मते घेऊन चौथ्या स्थान मिळविले. सावरबांधे यांना डावलून उमेदवारी दिलेले शिवसेनेचे किरण पांडव यांना पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. मध्य नागपुरातून काँग्रेसच्या महिला अध्यक्ष आभा पांडे यांनी बंडखोरी केली. मात्र, त्या पाच हजार आकडा गाठू शकल्या नाही. कारंजा लाडमधून राष्ट्रवादीचे प्रकाश डहाके यांनी बंडखोरी केली. मात्र, ते पाच हजाराच्यावर मते घेऊ शकले नाही. गडचिरोली मतदारसंघातून नामदेव उसेंडी यांनी बंडखोरी केली. मात्र, ते सुद्धा यशस्वी होऊ शकले नाही.  
माजी नगरसेवक धरमकुमार पाटील, राजू हत्तीठेले, उमरेड मतदारसंघात राजू पारवे, हिंगणामध्ये राहुल मून, रामटेकमध्ये काँग्रेसचे बंडखोर प्रकाश लोणारे निवडणुकीत पराभूत झाले.