आयाराम गयाराम संस्कृतीचा विचार केल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात (आरपीआय) गयारामांचीच संस्कृती प्रकर्षांने दिसते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा भाजपला शिव्या घालायच्या आणि त्यांच्याच आशीर्वादाने खासदार, आमदार, विधिमंडळ सदस्य, नगरसेवक, अशी पदे उपभोगायची, असा आरपीआयच्या नेत्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे.
संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित काँग्रेसविरोधी राजकारणाचा वारसा बॅ. राजाभाऊ खोब्रागडे, आवळेबाबूंनी पुढे चालवला. महापालिका निवडणुकीत राजाभाऊंनी जनसंघाला जवळ केले. मात्र, काँग्रेसबरोबर ते गेले मात्र नाहीत. काँग्रेसच्या गळाला पहिले आंबेडकरी नेते लागले ते दादासाहेब गायकवाड. त्यांनी साडेपाच लाख भूमिहिनांना घेऊन केलेल्या आंदोलनाचा धसका माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी घेतला होता. काँग्रेसशी केलेल्या घरोब्यामुळे दादासाहेबांना पदेही मिळाली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून रा.सू. गवई काँग्रेसमध्ये गेले. एक आमदार निवडून आला तरी ते विधानसभेचे अध्यक्षपद मिळायचे. हे दोन्ही नेते काँग्रेसशी कायम प्रामाणिक राहिले.
त्यानंतर प्रा. जोगेंद्र कवाडे, अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, प्रकाश गजभिये आणि डॉ. मिलिंद माने आदींनी आमदारकी आणि खासदारकीची स्वप्ने पाहतच कधी तळ्यात, तर कधी मळ्यात, अशी भूमिका घेतली. जोगेंद्र कवाडे यांनी कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी काँग्रेस, तर कधी भाजपशी जवळीक करून खासदारकी, आमदारकी मिळवली. आताही ते काँग्रेसच्याच शिफारशीने विधान परिषदेवर आहेत. ड्रॅगन पॅलेसमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांनी मामा जोगेंद्र कवाडे यांच्या पावलावर पाऊल टाकत कायम तडजोडीचे राजकारण केले. काँग्रेसच्याच बळावर त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. कामठीपुरत्याच मर्यादित राहिलेल्या सुलेखाताईंनी नुकत्याच झालेल्या कामठी भागातील नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपशी युती केली. गयाराममध्ये प्रकाश गजभिये आणि डॉ. मिलिंद माने यांचेही नाव चर्चेत आहे.
कालपरवापर्यंत रामदास आठवले यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे गजभिये हाताशी असलेल्या झोपडपट्टय़ांतील लोकांना घेऊन कायम आठवलेंच्या कार्यक्रमांना गर्दी करण्यापासून ते त्यांचे विमानाचे तिकिट काढून देण्यापर्यंतची सर्व कामे सांभाळत. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेचे गाजर दाखवल्याबरोबर तेही विधान परिषदेत जाऊन बसले. नागपुरातील व्हीएनआयटी वॉर्डमधून ते भाजपच्या पाठिंब्यावर निवडून यायचे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे एकेकाळी निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे डॉ. मिलिंद माने यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. आता ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘गुडबुक’मध्ये आहेत. त्यांच्यासारखा मितभाषी, उच्चशिक्षित आणि मवाळ प्रतिमा असलेला माणूस भाजपला हवाच आहे.
शाहू-फुले-आंबेडकर पदवीधर संघटनेच्या माध्यमातून यावर्षी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक त्रिकोणी करणारे सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी दोन महिन्यापूर्वी झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी नुकताच बसपमध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये बसपने महाराष्ट्रात पंख पसरायला सुरुवात केली आहे. बसपच्या उमेदवाराला मिळणारे मतदानही दखलपात्र असते. त्यामुळेच ५० पेक्षा जास्त गट असलेल्या आरपीआयच्या एकाही नेत्यावर आंबेडकरी जनता आता विश्वास ठेवायला तयार नाही. त्यांना बहुजन समाज पार्टी(बसपा) जवळची वाटते आणि निवडणुकीच्या वेळी तसे दानही बसपच्या खात्यात टाकायला जनता विसरत नाही. त्यामुळेच गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसनंतर मतांची टक्केवारी बसपकडे सर्वात जास्त आहे. मात्र, बसपने नेहमीच राजकीयदृष्टय़ा जागृत असलेल्या विदर्भातील आंबेडकरी जनतेचा विश्वासघात केल्याची भावना सार्वत्रिक आहे. स्वबळावर निवडून येण्याची क्षमता असतानाही कॅडरबेस कार्यकर्त्यांला उमेदवारी न देता ऐनवेळी इतर जातीच्या उमेदवारांचे ‘पार्सल’ लादले जाते, ही आंबेडकरी जनतेची खंत आहे. बसपने गेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव वैद्य यांना, तर लोकसभा निवडणुकीसाठी डॉ. मोहन गायकवाड यांना उमेदवारी दिली. माणिकराव वैद्य पराभूत झाल्यानंतर त्यांचे अस्तित्व कोठेच जाणवले नाही.