मुंबई- अहमदाबाद या सर्वाधिक रहदारीच्या राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर खाडीवरील एक पूल दुरुस्तीसाठी गेले तीन महिने बंद असल्याने घोडबंदर खाडीपलीकडील गावातील नागरिकांचे जिणे अवघड बनले आहे. एका गावावरून दुसऱ्या गावात जाताना १५ ते १७ किमी अंतराचा वळसा घालावा लागत असून पाच मिनिटांच्या प्रवासासाठी सुमारे तासभर लागत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. शिवाय या द्राविडी प्राणायामामुळे बहुमोल पेट्रोल, डिझेलचीही नासाडी होत आहे.
घोडबंदर खाडीपलीकडे मालजीपाडा, ससुनवघर, ससुपाडा, जूचंद्र अशी गावे आहेत. या भागातून दररोज हजारो रहिवासी कामासाठी मुंबई वा ठाणे भागात जात असतात. पूलदुरुस्तीचे काम रखडल्याने दररोज त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. २६ डिसेंबर २०१३ रोजी घोडबंदर-वसईला जोडणाऱ्या एका पुलाला तडा गेल्याचे लक्षात आल्याने त्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. पर्यायी मार्ग म्हणून दुसऱ्या बाजूच्या पुलावरून २० ते २५ मिनिटांच्या अंतराने एकेरी वाहतूक सुरू झाली. परिणामी एक एक तास वाहनांच्या रांगा लागू लागल्या. ठाण्याहून घोडबंदरमार्गे वसईला जाताना घोडबंदर (वर्सोवा) येथील वळण बंद केले. त्यामुळे पुढे काशिमीरा येथून वळसा घेऊन घोडबंदर खाडी पुलाकडे जावे लागत आहे. ठाणे येथून एसटीने प्रवास करताना तिकिटासाठी जादा पैसे खर्च करावे लागतात, अशी तक्रार ससुपाडा येथीस मनोज भोईर आणि चेना भागातील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार ठाकूर यांनी केली आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालले तरच गावकऱ्यांचे जगणे सुसह्य़ होईल, असे ते म्हणाले. या संदर्भात नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पुलासाठी लागणारे नवीन गर्डर अंकलेश्वर येथून मागवावे लागतात. दोन गर्डर तयार असून येत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होईल, असा दावा या अधिकाऱ्याने केला.