लोकसभा व विधानसभा निवडणुकीपेक्षा सर्वात अवघड निवडणूक ग्रामपंचायतीची आहे. नातेवाईक आप्तस्वकीय यापैकी एकालाच मतदार सहकार्य करणार एक मात्र नाराज होतो. यामधून अनेक वाद निर्माण होतात. ही परिस्थिती विधानसभा व लोकसभा निवडणुकीत नसते. अशा परिस्थितीत जानेफळमध्ये भाजप-शिवसेना युतीने १५ पैकी १२ सदस्य विजयी केले. ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे, असे गौरवोत्गार खासदार प्रतापराव जाधव यांनी काढले.
जानेफळ ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच, तसेच सर्व सदस्यांच्या जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच अंबादास सवडदकर होते. यावेळी मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर, जळगाव जामोदचे आमदार व बुलढाणा जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. संजय कुटे, खामगाव अर्बन बॅंकेचे संचालक जगदेवराव बाहेकर, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, सरस्वती शिक्षण संस्था जानेफळचे अध्यक्ष शरद मिटकरी, भाजप तालुकाध्यक्ष शंकर गायकवाड, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष लोहिया, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप ईलग यांची उपस्थिती होती.
यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी सरपंच गयाबाई देवकर यांचा साडी-चोळी देऊन, तर आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या हस्ते उपसरपंच डॉ. सतीश कुळकर्णी यांचा सत्कार करण्यात आला, तसेच नवनिर्वाचित सदस्य राजू वाळके, लक्ष्मी डोंगरे, नंदा सवडदकर, शे.गफूर बैलीमकर, बबन अवचार, जुगलकिशोर राठी, अलका शेजुळ, संगीता आश्रृबा इंगळे, क ौसल्याबाई पंजाब गवई व पंजाब गवई यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक डॉ.रा.ग.राठी यांनी केले व गावातील मूलभूत गरजा खासदार जाधव, आमदार रायमूलकर यांच्यासमोर मांडल्या. तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख विश्वास सवडदकर, शे.गफूर बैलीमकर यांनी भरघोस निधीची अपेक्षा व्यक्त केली, तसेच आमदार रायमूलकर यांनी पाणी पुरवठा योजनेवर एक्स्प्रेस फिडर, २०० व्यापारी गाळे बांधा वापरा व हस्तांतरित करा, या योजनेअंतर्गत देण्याची घोषणा केली. संचलन अॅड.काळे तर आभार विश्वासराव सवडदकर यांनी केले.