गेल्या आठवडय़ापासून शहरात आणि जिल्ह्य़ात सुरू असलेल्या पावसामुळे ‘वायरल फिव्हर’मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच गॅस्ट्रो, डायरिया, कावीळ, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने संसर्ग होण्याचा इशारा देण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शहरातील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था उघडी पडली असून जागोजागी खड्डय़ांमध्ये आणि खोलगट जागांमध्ये पाणी साचले असल्यामुळे अनेक वस्त्यांतील नागरिकांना दरुगधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनधिकृत वस्त्यांसह झोपडपट्टी भागात रोगराईला आमंत्रण देण्यासारखी स्थिती उद्भवल्यानंतर महापालिकेला जाग आली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात या रोगांचा प्रादुर्भाव होतो, डझनावारी लोक दगावतात आणि शेकडो लोकांना याचा संसर्ग होतो. साधारणत: पावसाळ्यात गटारे, घाण, उघडे पदार्थ या भोवती घोंघावणाऱ्या माशा, चिखलाचे साम्राज्य, दूषित पाणी यापासून संसर्गजन्य आजारांचा प्रसार होत असतानाही पूर्व खबरदारीचे उपाय करण्यात महापालिका यंत्रणा तोकडी पडली आहे. नाले आणि नागनदीची सफाई, गाळ काढण्याची कामे अर्धवट झाली आहे. खोलगट भागात पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी खबरदारी घेण्यात आली नसल्याने साचलेल्या पाण्यावरून दिसून आले आहे.
सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून पदार्थ विकणाऱ्यांचीही संख्या नागपुरात मोठय़ा प्रमाणात आहे. विशेषत: यशवंत स्टेडियम, धरमपेठेतील चिल्ड्रेन्स पार्क भोवतालचा परिसर, व्हीआयपी रोड, महाराजबाग परिसरात उघडे पदार्थ विकणारे हातठेले स्वच्छतेची पुरेशी काळजी न घेताच खाद्यपदार्थ विकतात. चायनीज, भेलपुरी, पानीपुरी, पावभाजी, ज्युस विक्रेते पाणी कोणते वापरतात. शिवाय खाद्यपदार्थ उघडय़ावर ठेवले जात असल्याने त्यावर माशा बसून रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने यापासून बचाव करण्याच्या दृष्टीने सूचनांचा पाऊस पाडला असला तरी मूळ कारणांकडे महापालिकेचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. जलकुंभांची वर्षांनुवर्षे स्वच्छता न झाल्याचा अत्यंत भयंकर प्रकार अलीकडेच माहिती अधिकारातून समोर आल्याने महापालिका यंत्रणा हादरली आहे.
यानंतरही आरोग्य विभागाने नागरिकांनी फक्त महापालिकेच्या नळांमधून पुरवठा होणारे पाणी प्यावे, असे आवाहन करून ‘सजगता’ दर्शविली आहे. उघडय़ावरील पदार्थ खाऊ नका, अशी सूचना देणारी महापालिकेची यंत्रणा उघडय़ावर पदार्थ विकणाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्याच्या कडेला असे ठेले उभे असलेले दिसून येतात. त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. हेच उघडे खाद्यपदार्थ रोगराई पसरविण्यास कारणीभूत ठरणार आहेत. प्रत्येक नागरिकाना परिसर स्वच्छ ठेवण्याची सूचना असली तरी कोणत्याही वस्तीतील नागरिक स्वत:हून स्वच्छता पाळत नाहीत.
कचरा रस्त्यावर फेकण्याची परंपरा संत्रानगरीतील नागरिकांनी कायम ठेवली आहे. यावर तातडीने नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे मत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी नोंदवले.
दरम्यान, महापौर प्रवीण दटके यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेताच दुसऱ्या दिवशी आरोग्य विभागाची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शहरात पाच सहा दिवसांपासून मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्ण आढळून आल्यावर स्वच्छतेबाबत जनजागृती अभियान राबविण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. पावसाळ्यामध्ये होत असलेल्या दुर्गंधीबाबत नागरिकांच्या तक्रारी असतील आणि त्यावर कारवाई केली जात नसेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दटके यांनी दिला.