4
पावसाचे अनियमित टप्पे आणि तापमानात वारंवार होत असलेले चढउतार यामुळे मुंबईत पुन्हा एकदा सर्दी, तापाने उचल खाल्ली आहे. हवेतून पसरणाऱ्या विषाणूंमुळे घरात किमान दोघे सर्दी-पडसे व तापाने हैराण झाले आहेत. जूनच्या सुरुवातीला पावसाळ्यासोबत आलेल्या संसर्गाच्या साथीने नोव्हेंबरमध्ये छोटासा ब्रेक घेऊन पुनरागमन केले असून डेंग्यू आणि मलेरियाच्या साथीपेक्षाही सामान्य तापाने मुंबईकर फणफणले आहेत.
जूनमध्ये पावसाला सुरुवात होताना विषाणूसंसर्गामुळे होत असलेल्या सर्दी-तापाची साथ येते. पावसाळ्यात हे रुग्ण अधिक संख्येने असतात. मात्र पाऊस ओसरला की ही साथ कमी होते आणि थंडीची सुरुवात होताना पुन्हा परतते. मात्र यावर्षी जूनपासून सुरू झालेल्या रुग्णांची संख्या नोव्हेंबरमधले अगदी थोडे दिवस वगळता कायम राहिली आहे. तापमानात सतत होत असलेले चढउतार यासाठी कारणीभूत ठरले आहेत. तापमानातील वाढ आणि कोरडी हवा यामुळे विषाणूंची संख्या वाढते. त्यामुळे संसर्गाचीही शक्यता अधिक होते. याचेच परिणाम सध्या मुंबईत दिसत असून दवाखान्यांसोबतच ट्रेन, बस, कार्यालये, उद्याने अशा सर्वच ठिकाणी रुमाल हातात घेऊन शिंकणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढलेली आहे. 

पावसाळ्यात वाढलेला मलेरिया आणि पावसानंतर उद्रेक झालेला डेंग्यू या दोन्हींवर थंडीने नियंत्रण आणले असले तरी विषाणू संसर्गामुळे होत असलेल्या सर्दी-खोकला-ताप यांच्या साथीचा वेग वाढला आहे. प्रत्येक घरात सर्दी-खोकल्याचे विषाणू पोहोचले असून एकाचा आजार बरा होईपर्यंत कुटुंबातले इतर जण आजारी पडत आहे. त्यामुळे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंतच्या रांगा दवाखान्यात आहेत. खरे तर विषाणूजन्य ताप हा योग्य आहार, पाणी व आराम यामुळे बरा होतो. मात्र त्यासाठी दोन ते तीन दिवस घरी राहणे हा योग्य पर्याय असतो. मात्र सतत घडय़ाळाच्या काटय़ावर पळत असलेल्या मुंबईकरांना कामातून वेळ मिळत नसल्याने अनेकदा सर्दी-ताप बळावताना दिसत आहेत. पालिकेच्या रुग्णालयातील नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ातील रुग्णांची संख्या तुलनेने कमी दिसत असली तरी ती केवळ रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या आहे. बाह्य़ रुग्ण विभागातून औषध घेऊन जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढले असल्याचे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.
फॅमिली डॉक्टरांकडेही रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सर्दी-तापाचे अनेक रुग्ण सध्या येत आहेत. गेल्या महिन्यात रुग्णांची संख्या रोडावली होती, मात्र थंडी सुरू होताना अनेकांना या आजारांनी गाठले आहे. औषधे आणि आराम यामुळे लवकर आराम पडत असला तरी तीन-चार दिवस मात्र त्रास होतोच, असे फॅमिली डॉक्टर अशोक कोठारी यांनी सांगितले.