‘बोलणाऱ्याचे दगडसुद्धा विकले जातात आणि न बोलणाऱ्याचे हिरेही पडून राहतात,’ असे म्हणतात. याच प्रचारविन्मुख वृत्तीमुळे नव्या शोधाच्या जोरावर तयार झालेली अनेक वैज्ञानिक उपकरणे दुर्लक्षित राहतात. माटुंग्याच्या ‘वीर जिजामाता तंत्रशिक्षण संस्था’ या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी मात्र आजच्या युगातले प्रचारतंत्राचे महत्त्व जाणून आपल्या शोधाच्या जोरावर बाजी मारत देशात अव्वल येण्याची कामगिरी केली आहे. ‘सुप्रा सी इंडिया, २०१४’ या नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत व्हीजेटीआयच्या या विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली आहे.
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आपले ज्ञान व कौशल्य दाखविण्याची संधी या स्पर्धेत मिळते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसमोर फॉम्र्युला रेसिंग कार तयार करण्याचे आव्हान असते. डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ही रेसिंग कार सुरक्षित असावी, अशी अपेक्षा असते. या अपेक्षांचे भान बाळगत व्हीजेटीआयच्या ‘मोटरब्रीद’ नामक विद्यार्थी चमूने वर्षभर खपून या स्पर्धेकरिता कार तयार केली.
व्हीजेटीआयच्या रेसिंग कारने पहिल्या दहांत येण्याची कामगिरी केली; पण आपली कार ही केवळ ‘बच्चों के खेलने की चीज’ नसून तिला जागतिक बाजारपेठही आहे, हे परीक्षकांच्या मनावर ठसविण्यात व्हीजेटीआयचा विद्यार्थ्यांचा चमू यशस्वी ठरला. या रेसिंग कारचे मार्केटिंग आणि बिझनेस करण्याचा जोरदार ‘प्लॅन’ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत मांडला. विद्यार्थ्यांचे हे कार विकण्याचे कौशल्यही देशात अव्वल ठरले आणि स्पर्धेच्या ‘बिझनेस प्रेझेंटेशन’च्या पहिल्या बक्षिसावर व्हीजेटीआयचे नाव कोरण्यात ‘मोटरब्रीद’ला यश आले. देशभरातील अभियांत्रिकीच्या हजारो महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमधून व्हीजेटीआयच्या विद्यार्थ्यांनी ही कामगिरी केली आहे.
ट्रॉफी आणि ३० हजार रुपये रोख असे या बक्षिसाचे स्वरूप होते. पण बक्षिसापेक्षाही अव्वल ठरल्याची भावना आम्हाला जास्त महत्त्वाची वाटते, अशा शब्दांत ‘मोटरब्रीद’चा व्यवस्थापकीय प्रमुख हामजा अन्सारी याने समाधान व्यक्त केले.
बाजारात प्रथमच उतरणारी कंपनीदेखील ही कार यशस्वीपणे विकू शकेल, या दृष्टीने आम्ही ही योजना तयार केली होती. केवळ कार विकण्याचे कसबच नव्हे तर ती बनविण्याकरिता वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, मार्केटिंग, विक्री, ग्राहक सेवा आदींचा विचारही यात करण्यात आला होता.
याशिवाय संबंधित कंपनी नफा मिळवू शकेल की नाही, बाजारात टिकू शकेल की नाही, याचेही गणित जुळविण्यात आले होते, असे व्हीजेटीआयच्या बिझनेस प्लॅनविषयी माहिती देताना हामजा याने सांगितले. स्पर्धेचे परीक्षक असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आपली योजना पटवून देणे, हे मोठे आव्हान होते; पण आमच्या सांघिक प्रयत्नांमुळे आम्ही ते पेलून नेले, अशी पुस्तीही त्याने जोडली. हामजाला त्याची सहकारी कमालिका रॉय हिचेही सहकार्य ही योजना तयार करण्याकरिता मिळाले.