जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कारभार आणि त्यातील सरकारी गलथानपणा यांच्या गोष्टी वारंवार समोर आल्या आहेत. ‘निशाणी डावा अंगठा’सारख्या कादंबरीतून तर या गोष्टींचा लेखाजोगा खूपच मजेदार पद्धतीने मांडला आहे. मात्र या सर्व गोष्टींना छेद देणारा एक समारंभ नव्या वर्षांच्या सुरुवातीला ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यातील एका छोटय़ाशा गावात घडला. शहापूरपासूनही ३५ किलोमीटर आत डोंगरात असलेल्या या बेलवली गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत जिल्हा परिषद शाळेची गरज लक्षात घेऊन चक्क शाळेसाठी एक वर्ग बांधला. त्यासाठी ग्रामस्थांनी पैसे तर काढलेच, पण सहा महिने श्रमदान करून बांधलेला हा वर्ग नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी सरकारकडे सुपूर्द केला. आदिवासी तालुका आणि मुंबई शहराला पाणी पाजणारा तालुका, अशी शहापूर तालुक्याची ओळख! याच तालुक्यात शहापूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेले एक गाव म्हणजे बेलवली. ६० उंबऱ्यांच्या या गावात राज्य सरकारच्या ‘गाव तिथे शाळा’ या धोरणानुसार जिल्हा परिषदेची एक शाळाही आहे. शाळा म्हणजे एक वर्ग आणि दोन शिक्षक! फक्त तीनशेच्या आसपास लोकवस्ती असलेल्या या गावात पहिली ते चौथी या चार वर्गासाठी एकूण ३० मुले शिकतात. मात्र चार वेगवेगळ्या इयत्तांचे वर्ग एकाच खोलीत घेताना शिक्षकांची मात्र चांगलीच त्रेधा उडत होती.
आपल्याच गावच्या पोरांची शिक्षणाच्या बाबतीत होणारी ही आबाळ गावकऱ्यांनाच बघवली नाही. गावातील ‘एकता शेतकरी मंडळा’ने एकत्र येऊन सरकारची मदत न मागता शाळेसाठी आणखी एक वर्ग बांधण्याचे ठरवले. शाळेतील मुख्य शिक्षक धिरज डोंगरे आणि उपशिक्षक पुंडलिक गुडे यांनीही गावकऱ्यांच्या उत्साहाला योग्य दिशा दिली. ‘एकता शेतकरी मंडळा’ने सर्व गावातील लोकांना एकत्र करून वर्गणी काढली. आदिवासी भागातील आणि अत्यंत छोटय़ा गावातूनही या शाळेसाठी सर्व गावकऱ्यांनी तब्बल सव्वा लाख रुपये जमा केले. विशेष म्हणजे त्यासाठी गावाबाहेरच्या कोणाचीही मदत त्यांनी घेतली नाही.
पैसे गोळा करून आम्ही थांबलो नाही. तर ही शाळा आपल्या गावची आहे, या भावनेतून आम्ही सर्वानी पुढाकार घेत श्रमदान करून हा वर्ग बांधण्याचे ठरवले. त्यासाठी गावातील प्रत्येकाला काम वाटून देण्यात आले, असे एकता शेतकरी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल परसू भोईर यांनी सांगितले. विठ्ठल भोईर यांच्याप्रमाणेच गावातील हिरामण भोईर, शंकर भोईर यांनीही सक्रिय सहभाग घेत कामाची वाटणी केली. शाळा बांधतानाही ती गावातल्या लोकांच्याच श्रमातून उभी राहील, याकडे आमचा कल होता, असेही भोईर यांनी सांगितले.
अखेर सहा महिन्यांच्या श्रमदानातून हा वर्ग उभा राहिला. इतरांसाठी ही केवळ एक इमारत असली, तरी आमच्या पोरांसाठी ही सरस्वती देवीची मूर्तीच आहे. ती आमच्या हातून घडली, याचा आम्हाला अभिमान आहे, असे विठ्ठल भोईर यांनी सांगितले. गावकऱ्यांची ही जिद्द वाखाणण्याजोगी होती. शाळेला आणखी एका वर्गाची गरज आहे, हे कळल्यावर गावकऱ्यांनी सरकारकडे हात पसरण्यापेक्षा आपल्या जिद्दीने हा वर्ग बांधून पूर्ण केला. अशा गावात काम करण्याचा अनुभवही खूप वेगळा आहे, असे शाळेचे मुख्य शिक्षक धिरज डोंगरे यांनी सांगितले. याआधीही शाळेशी निगडित कोणत्याही उपक्रमात गावकरी असेच हिरिरीने पुढे येतात, असेही त्यांनी नमूद केले.
नव्या वर्षांच्या पहिल्या दिवशी स्थानिक आमदार पांडुरंग बरोरा आणि शहापूरच्या पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी आशीष झुंजारराव यांच्या हस्ते हा वर्ग शासनाला सुपूर्द करण्यात आला. या वर्गात अद्ययावत संगणक प्रशिक्षण प्रयोगशाळा सुरू करण्याचा विचार आहे. तसेच विद्यार्थ्यांना नवीन जगाचे ज्ञान मिळेल, अशा गोष्टी या वर्गात उपलब्ध करून देण्यात येतील, असे डोंगरे यांनी स्पष्ट केले.
रोहन टिल्लू, मुंबईे