लोकसभा निवडणुकीत मतदार याद्यांमधील आणि ईव्हीएम मशीनमधील त्रुटींमुळे झालेला घोळ लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी याद्या अद्ययावत करण्याचे काम पुढील महिन्यात हाती घेतले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रशासन कामाला लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदानादरम्यान आलेल्या अडचणीची पुनरावृत्ती होणार नाही व अडचणी दूर करण्याच्या दिशेने निवडणूक विभाग सूचना देणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदार फोटो, ओळखपत्राच्या बऱ्याच अडचणी आल्या. नव्याने देण्यात आलेल्या ओळखपत्रातही अनेक त्रुटी आढळून आल्या. मतदान केंद्रावर अनेक पुरवणी याद्या गहाळ झाल्या होत्या. मतदान केंद्रावर गेल्यावर ओळखपत्र असताना मतदार यादीत नाव नसल्यामुळे अनेक भागात मतदारांनी गोंधळ घातला. ज्यांचे निधन झाले अशा लोकांच्या नावाने मतदान झाल्याचे काही केंद्रावर दिसून आले. त्यामुळे अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदारांच्या असंतोषाचा सामना करावा लागला. मतदारयाद्या अद्ययावत करण्याचे काम १६ मे नंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. मतदानाच्यावेळी काही जणांकडे मतदार फोटो ओळखपत्रे होती; पण यादीत नावच नव्हते. तर काही ठिकाणी मतदान केंद्रावरील मतदार यादीमध्ये मतदाराचे नाव व फोटो होते. परंतु मतदान ओळखपत्र नसल्याने मतदान करता आले नाही. मतदान केंद्रावरील फोटो, मतदार याद्या अस्पष्ट असल्याने मतदारांची ओळख पटवणे कठीण जात होते. विधानसभा निवडणुकीत अशा अडचणी येऊ नये यासाठी रंगीत फोटोसह मतदारयाद्या तयार करण्याबाबत निवडणूक आयोग विचार करीत असल्याची माहिती आहे. मतदान करताना अडचणी आल्याने मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होतो. याचा प्रत्यय नागपूर लोकसभा मतदारसंघात आला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट करणे, मरण पावलेले वा पत्ता बदलल्यांची नावे यादीतून कमी करणे, प्रत्येक मतदारांना फोटो, मतदार ओळखपत्र देणे याबाबींवर विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ एप्रिलला पार पडलेल्या निवडणुकीच्या साहित्याची छपाई भोपाळ येथे झाली होती. त्यामुळे छपाईमध्ये काही त्रुटी राहिल्यात तर त्या दुरुस्त करण्यात बराच कालावधी लागतो. ही अडचण लक्षात घेता निवडणूक साहित्याची छपाई राज्यातच व्हावी, यादृष्टीने प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.