मृत व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये आहे. मात्र ज्यांनी अनेक वर्षांपासून मतदानाचा हक्क बजावला त्यांची नावे लोकसभेच्या मतदार यादीत शोधून सापडली नाहीत. हा सर्व घोळ पनवेलच्या मतदार यादींमध्ये झाल्याने मतदार निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल चांगलेच संतापले होते. पनवेलच्या शहरी मतदारांना लोकसभेसाठी मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. ही परिस्थिती कळंबोली, खारघर, खांदा कॉलनी, कामोठे या शहरांमधील मतदारांची झाली.
मतदारांना नेहमीच्या मतदार यादीत आपले नाव नसल्याने अनेक ठिकाणी खेटे मारावे लागले. मात्र त्यानंतरही या मतदारांना नावे सापडली नाहीत. कळंबोली येथील प्रदीप फडतरे, मनीषा फडतरे, संजय बोडवे आणि रामचंद्र हळदणकर यांची नावे यादी क्रमांक १२९ मध्ये होती. या सर्वानी याअगोदरच्या निवडणुकांमध्ये मतदान करून भारतीय नागरिकत्वाचा हक्क बजावला आहे. मात्र गुरुवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत यांची नावे यादीतून वगळण्यात आली होती. तसेच रामचंद्र हळदणकर यांच्या पत्नी शिल्पा यांचा गेल्या वर्षीच मृत्यू झाला. तसा दाखलाही हळदणकर कुटुंबीयांनी सरकारदरबारी जमा केला आहे. मात्र शिल्पा यांचे नाव या यादीत राहिले आणि त्यांचे पती रामचंद्र यांच्याकडून मतदानाचा हक्क निवडणूक आयोगाने हिरावून घेतला.
कळंबोली येथील सुधागड विद्यालयात मतदान केंद्रासमोर राहणारे रश्मी कुडाळकर, राजन कुडाळकर यांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे. मात्र त्यांची नावे शोधून त्यांना सापडली नाहीत. अशीच अवस्था कळंबोली शहरातील आरपीआयचे शहराध्यक्ष मोहन बळखंडे यांचीही झाली. बळखंडे यांचे नाव आयोगाने वगळल्याने इतरांचे नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी धावणाऱ्या बळखंडे यांनाही हातावर हात ठेवण्याशिवाय निवडणूक आयोगाने पर्याय ठेवलेला नाही. निवडणूक आयोगाच्या या चुकीच्या कारभारामुळे मतदार दुखावला गेला आहे. या वर्षांत पनवेलमध्ये ९० हजार नवीन मतदारांची नोंद झाली आहे. नवीनांच्या नवलाईत निवडणूक यंत्रणा जुन्यांना विसरल्याचे मतदारांकडून बोलले जात होते. खांदा कॉलनी येथील एका मतदाराचे नाव तीन किलोमीटर दूर असलेल्या कळंबोली शहरातील मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. अशा अनेक गोंधळामुळे मतदारांनी निवडणूक आयोगाच्या नावाने बोंबाबोंब केली.