नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अजून नऊ दिवसांचा कालावधी बाकी असला तरी निवडणुकीच्या कामात गुंतलेल्या जवळपास २० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. मतदानाच्या दिवशी संबंधितांची नेमणूक त्यांचे नांव ज्या लोकसभा मतदारसंघात आहे, त्याच क्षेत्रात झाल्यास इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे मतदान करता येईल. तथापि, त्यांची नियुक्ती अन्य लोकसभा मतदारसंघात झाल्यास टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कागदी मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासह जिल्हय़ाचा काही भाग धुळे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होतो. या तिन्ही ठिकाणी २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी अधिकारी व कर्मचारी मिळून १८ हजार ७४७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. आदल्या दिवशीपासून या कामात गुंतलेल्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया झाल्यावर मतदान यंत्र जिल्हा निवडणूक शाखेकडे सुपूर्द करेपर्यंत म्हणजे रात्री उशिरापर्यंत सुटका होत नाही. या पाश्र्वभूमीवर, इतक्या मोठय़ा संख्येने असणाऱ्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी स्वतंत्रपणे मतदान प्रक्रिया राबविली जाते. त्याचे स्वरूप बहुतांशी सेना दलातील मतदारांप्रमाणे टपाली स्वरूपाचे असते. मात्र, निवडणूक कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारेही मतदान करता येते. केवळ, त्यासाठी त्यांचे मतदार यादीतील नांव नियुक्ती झालेल्या मतदारसंघात असणे आवश्यक आहे.
निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांचे नांव ज्या मतदार यादीत आहे, त्या भागातील केंद्र दिले जात नाही. जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघाचा काही भाग समाविष्ट होतो. एका मतदारसंघातील अधिकाऱ्याची नियुक्ती दुसऱ्या लोकसभा मतदारसंघात झाल्यास त्याला इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदान करता येणार नाही. परंतु, कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्याचे मतदार यादीत नांव असलेल्या लोकसभा मतदारसंघातच झाल्यास त्यांना यंत्राद्वारे मतदानाचा पर्याय निवडता येईल. मतदानापासून हे अधिकारी व कर्मचारी वंचित राहू नयेत म्हणून ही खास व्यवस्था करण्यात आली आहे. नाशिक लोकसभेसाठी दहा हजार तर दिंडोरीसाठी दहा हजार अशा सुमारे २० हजार कागदी मतपत्रिका संबंधित साहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या आहेत. मतदानासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधितांना आधी मागणी नोंदवावी लागणार आहे. निवडणूक कार्य प्रमाणपत्र व घोषणापत्र सादर करून त्यांना निवडणुकीसाठी मतदान करता येईल. संबंधितांची नियुक्ती कोणत्या मतदारसंघात होणार ही बाब मतदानाच्या आदल्या दिवशी स्पष्ट होईल. त्यामुळे उपरोक्त पद्धतीने अथवा टपालाने मतदान करण्याची मुभा त्यांना राहणार आहे. या प्रक्रियेला सुरुवात झाली असून १६ मेपर्यंत संबंधितांची मतदान प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.