नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर आरूढ होत लोकसभा निवडणुकीत मतदानाचे नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या मतदारांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही विक्रमी मतदान केल्याचे चित्र स्पष्ट होत असून ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीनुसार दिसून येत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांमधील आकडा लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत फारसा वाढलेला नाही. तरीही ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या शहरांमधील मतदानाची  टक्केवारी काही प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.
मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांमध्ये गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदान प्रक्रियेत उदासीनता दिसून येत असे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या परिसरांतील काही मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी जेमतेम ४५ टक्क्य़ांच्या घरात असायची. लोकसभा निवडणुकीत मात्र हे चित्र पालटले. नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार होत शहरी भागातील मतदार मोठय़ा संख्येने घराबाहेर पडले. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला. तरीही ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात मतदानाचा फारसा उत्साह त्यावेळी दिसून आला नव्हता. या भागातील मतदानाची टक्केवारी जेमतेम वाढली होती. मुरबाड, अंबरनाथ यांसारख्या मतदारसंघांमध्ये जेमतेम ४० टक्क्य़ांच्या घरात मतदान झाल्याचे पाहवयास मिळाले. विधानसभा निवडणुकीत मात्र हे चित्र पूर्णपणे पालटले असून ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांमधील काही मतदारसंघात ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक मतदान झाल्याचे चित्र पुढे येत आहे. भिवंडी (ग्रामीण) मतदारसंघात सर्वाधिक ६६.२४ टक्के इतके मतदान झाले असून लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात जेमतेम ४८ टक्क्य़ांच्या घरात मतदान झाले होते. या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये मोठी चुरस असून त्यामुळे ही टक्केवारी वाढली असल्याचा कयास बांधला जात आहे.
शहरी टक्का जेमतेम वाढला
ग्रामीण भागाच्या तुलनेत मतदानाचा शहरी टक्का मात्र जेमतेम वाढला असून ठाणे महापालिका हद्दीतील चार विधानसभा मतदारसंघांत तर लोकसभेच्या तुलनेत यंदा मतदान कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. ठाणे जिल्ह्य़ातील सुशिक्षित आणि पांढरपेशा मतदारसंघ अशी ओळख असणाऱ्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात ५६.५६ टक्के इतके मतदान झाले असून लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघात ५६.७५ टक्के इतके मतदान झाले होते. असे असले तरी मतदारांची संख्या मागील पाच महिन्यांत वाढल्याने मतदान केलेल्या नागरिकांचा आकडा मात्र गेल्या वेळच्या तुलनेत काकणभर का होईना अधिक भरला आहे.
कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजीवडा, नवी मुंबईतील बेलापूर या मतदारसंघातील टक्केवारी मात्र गेल्या वेळच्या तुलनेत कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल सात टक्क्य़ांनी मतदान वाढले असून कळवा-खारीगाव पट्टयातील वाढलेले मतदान नेमके कुणाच्या पारडय़ात पडते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातील मुस्लिमबहुल मुंब्रा परिसरात लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान काहीसे कमी झाल्याचे दिसून आले आहे. डोंबिवली विधानसभा क्षेत्रातही मतदानात वाढ झाली असली तरी अंबरनाथ भागातील मतदारांची मतदान प्रक्रियेतील उदासीनता यंदाही दिसून आली आहे.
महिलांचा टक्का वाढला
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून पुरुषांपेक्षा महिला मतदारांनी अधिक मतदान केल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्य़ातील इतर मतदारसंघातही पुरुषांच्या तुलनेत महिलांचे मतदानही गेल्या वेळच्या तुलनेत चांगल्या संख्येने झाल्याचे चित्र दिसले. जिल्ह्य़ातील ३२ लाख ७१ हजार ५०१ पुरुष मतदारांपैकी १६ लाख ७३ हजार ४७२ मतदारांनी आपला हक्का बजाविला तर १३ लाख ३६ हजार ३०१ महिला मतदारांनी मतदान केले. पुरुषांच्या मतदानाचा टक्का ५१.१५ तर महिला मतदारांचा टक्का ४९.१४ इतका होता.
tv04