बंदरावर आधारी मालाची साठवणूक करणारे खोपटे येथे ऑल कागरे नावाचे गोदाम असून या गोदामात गेल्या दोन वर्षांपासून मांसाने भरलेले कंटेनर असून ते कुजल्याने गोदामात दरुगधी पसरली आहे. त्यामुळे येथील अनेक कामगारांना ताप येऊ लागला आहे. तसेच श्वसनालाही त्रास होत असल्याने कामगारांनी मंगळवारी काम बंद आंदोलन करून कंटेनर हटविण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी या गोदामात काम करणाऱ्या एका कामगाराचा स्वाइन फ्लूची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
उरण तालुक्यात बंदरातील मालाची साठवणूक करणाऱ्या खासगी गोदामांची संख्या ६०पेक्षा अधिक आहे. या गोदामात विविध प्रकारच्या मालाची हाताळणी केली जाते. ऑल कार्गो गोदामात दोन वर्षांपूर्वी मांसाने भरलेले दोन कंटेनर आणण्यात आलेले होते.
या कंटेनरमधील मांस कुजल्याने गोदामात दरुगधी पसरली आहे. त्यामुळे कामगारांना नाकाला रुमाल लावूनच काम करावे लागते. कामगारांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गोदामातील २५० पेक्षा अधिक कामगारांनी मंगळवारी अचानकपणे कंटेनर हटविण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन केले. याची दखल घेत उरणचे तहसीलदार उरणचे वन विभागाचे वनपाल तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांनी तातडीने गोदामाला भेट देऊन गोदाम व्यवस्थापनाशी चर्चा केली.
या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी न मिळाल्याने कंटेनरची विल्हेवाट लावण्यात आली नव्हती. मात्र सध्या परवानगी मिळाल्याने कंटेनर हटविण्यात येऊन विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती ऑल कागरेचे व्यवस्थापक ए. के. यादव यांनी दिली आहे.