‘देश के प्यारे, जगत के दुलारे, मातृभूमी के सुपुत्र न्यारे, पधारे विवेकानंद हमारे, स्वामी चरण प्रणाम तुम्हारे’ असे अभिमानास्पद सुमधुर गीताने कराडकरांना भारून टाकणारा पाच घोडय़ांचा सजवलेला व स्वामी विवेकानंद यांची भव्य मूर्ती असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या रथयात्रेचे शहराच्या प्रमुख मार्गावरील चौकाचौकांत उत्स्फूर्त स्वागत झाले.
स्वामी विवेकानंद यांचा १५०वा जयंती महोत्सवानिमित्त रामकृष्ण मठ पुणे यांच्या वतीने व रामकृष्ण विवेकानंद सेवा समिती, कराड यांच्या विद्यमाने कराड शहरात रथयात्रेचे आगमन कराड शहरात झाले असून, यानिमित्त चित्रप्रदर्शन व ग्रंथविक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात रथ दाखल झाल्यावर नगराध्यक्ष प्रा. उमा हिंगमिरे, श्री मारुतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती साबळेमामा यांनी पुष्पहार अर्पण करून रथयात्रेचे स्वागत करून रथयात्रेस प्रारंभ करण्यात आला. रथयात्रेत पुण्याच्या रामकृष्ण मठाचे साधक तसेच येथील श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा समितीचे सेवक सहभागी झाले होते.
लाहोटी कन्या शाळेच्या विद्यार्थिनी तसेच वडगाव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांची ढोल, ताशांच्या निनादातील व झांज पथकासह रथयात्रा पांढरीचा मारुती मंदिरापासून मार्गस्थ झाली. चावडी चौकातून मुख्य बाजारपेठेने रथयात्रा दत्त चौकात येऊन विसावली. श्रीरामकृष्ण विवेकानंद सेवा समितीचे अशोक पवार, अ‍ॅड. रवींद्र कदम, अ‍ॅड. मकरंद सबनीस, नितीन कुलकर्णी, समविचारी संस्थेच्या प्रियंका मसूरकर, अ‍ॅड. परवेझ सुतार तसेच नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान, कराडनजीकच्या मलकापूर येथेही या भव्य रथयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत झाले.